Thursday, February 7, 2019

८. सुंदर सुरेख वोतिलें । परब्रह्म तेज फांकलें



सुंदर सुरेख वोतिलें । परब्रह्म तेज फांकलें ।
ते व्योमीं व्योम सामावलें । नयनीं वो माय ॥१॥
कमलनयन सुमन फांकलें ।
त्या परिमळा आथिलें । मकरंदी वो माय ॥२॥
संकोचला संसार । पारूषला व्यवहार ।
ब्रह्मानंद अपार । जहाला वो माय ॥३॥
मधुर वेदवाणी । न पवे ज्याच्या गुणीं ।
तें ठकावलें निर्वाणीं । नेति मुखें वो माय ॥४॥
या परतें बोलणें । न बोलणें होणें ।
तें म्यां आपुल्या अंगवणें । केलें वो माय ॥५॥
ऐसियातें वोठी । लागलें तयाचे पाठीं ।
रखुमादेविवरा भेटी । विठ्ठलीं वो माय ॥६॥

भावार्थ
श्रीहरीच्या या ओतीव सगुण रूपात परब्रह्माचे तेज फाकलेले आहे. त्यामुळे ते अत्यंत सुंदर व सुरेख दिसत आहे. आकाशात आकाश सामावून जावे तसे हे रूप माझ्या डोळ्यांत साठवले आहे ग माय.(१) याचे कमळासारखे डोळे कमळ उमलावे तसे पूर्ण उघडलेले असून ते सुगंधाने व मधाने परिपूर्ण आहेत.(२) हे रूप पाहिल्यामुळे माझा संसार संपला, व्यवहार थांबला आणि अपार असा ब्रह्मानंद लाभला.(३) अत्यंत मधुर अशी वेदवाणी याचे गुण गाण्यास असमर्थ ठरली आणि शेवटी तीही ‘नेति नेति’ म्हणत कुंठित झाली.(४) आता यापुढे त्याच्याविषयी काही बोलणे म्हणजे न बोलणेच होय. कारण त्या रूपाला मी माझे अंगच करून घेतले आहे.(५) अशा श्रीहरीचे सतत स्मरण करीत माझे दोन ओठ त्याच्या पाठीशी लागले आहेत. तो रखुमादेवीचा पती श्रीविठ्ठल मला भेटला ग माय.(६)

विवरण
श्रीहरीच्या सगुण रूपसौंदर्याने ज्ञानदेवांचे सौंदर्यान्वेषी मन अगदी वेडावून गेले आहे. बाहेर सौंदर्यशोधक दिठी आणि आत अद्वैताची मिठी अशी ज्ञानदेवांची अवस्था झालेली आहे. सारस्वताने दुभणार्‍या कविमनाला आत्मसाक्षात्कार झाला की काय घडते याचे ज्ञानदेव हे मूर्तिमंत उदाहरण आहे. सरस्वती जिव्हेवर बसलेली, मग आतून फुटणार्‍या सुखोर्मीला शब्दरूप लाभले नाही तरच नवल! त्यातही विटेवरले सावळे परब्रह्म हाती लागलेले. प्रतिभेला आवाहन करणारा एवढा उत्तम आणि उदात्त विषय मिळालेला. मग जन्मतः नक्षत्रांचे देणे घेऊन आलेल्या ज्ञानदेवांची रसवंती अधिकाधिक रसाळ होणार नाही तर काय! श्रीविठ्ठलाच्या सगुण-निर्गुण रूपाचे लावण्य वर्णिताना ज्ञानदेव अत्यंत तन्मय होतात. विठ्ठलाच्या लावण्याने ज्ञानदेवांच्या शब्दांना सौंदर्य लाभले की ज्ञानदेवांच्या शब्दांनी विठ्ठलाचे लावण्य झळाळून गेले, असा प्रश्‍न रसिक-आस्वादकांना पडावा अशी इथली स्थिती आहे.
परब्रह्माचे कृष्णरूप मोठे विलोभनीय. त्याच्यात जणू सौंदर्य ओतलेले आहे. सुवर्णाचा रस साच्यात ओतून एखादी ओतीव मूर्ती घडवावी तसे. सौंदर्य ओतून जणू कृष्णरूप घडवले आहे. सौंदर्यात सुरेखता असते. किंबहुना, जे सुरेख असते तेच सुंदर असते. आकृती म्हणजे एक रेखाच असते. ही रेखा पुरेशी वक्र झाली की ‘सु-रेख’ होते. व्यवहारात सरळपणाला महत्त्व असले तरी चित्रकलेत वक्रता महत्त्वाची असते. रेखा वक्र झाली नाही तर वर्तुळ होणार नाही. रेखेने वक्र होणे नाकारले तर ती सु-रेख होणार नाही. ज्या व्यक्तीची शरीररेखा वक्र असते त्या व्यक्तीचे शरीरसौष्ठव उठून दिसते. अशा व्यक्तीलाच आपण सुंदर म्हणू लागतो. सौंदर्य केवळ चरबी-चर्मात नसते, ते असते शरीररेखेच्या वक्रतेत. ‘सिंहकटी’ हे पूर्वसूरींनी सांगितलेले सौंदर्यलक्षण शरीररेखेची वक्रताच सूचित करते.

शरीररेखेची ही वक्रता, सु-रेखता कृष्णाच्या ठायी तर पूरेपूर आहे. त्याचे दिडक्या पायावर उभे असलेले, ओठाजवळ मुरली धरलेले रूप किती सुरेख, सुंदर आहे! विठ्ठलाचे विटेवर उभे असलेले ‘सुंदर ते ध्यान’ आठवून तर पाहा. दोन्ही पाय जोडून तो उभा आहे. अगदी ताठ, सरळ. दोन्ही हात फक्त कमरेवर ठेवलेले. परंतु तेवढ्यामुळे शरीररेखा वक्र होऊन किती सु-रेख झाली! ‘सुंदर ते ध्यान’ यापेक्षा या रूपाविषयी अधिक काय बोलावे? विठ्ठलाने कमरेवर हात काढून ते सरळ ठेवले आहेत अशी कल्पना करून पहावी, मग कमरेवरच्या हातांनी सौंदर्याला कसा उठाव मिळाला हे ध्यानात येईल. श्रीहरी असा ‘सु-रेख’ आहे. म्हणून सुंदर आहे. कृष्णरूपाची ही सुंदर सुरेखता किंवा सुरेख सुंदरता ज्ञानदेवांच्या सौंदर्यदृष्टीत भरून राहिलेली आहे.

असे सुंदर, सुरेख ओतीव रूप. त्यातून परब्रह्माचे तेज फाकलेले आहे. त्यामुळे ते अधिकच सुंदर झाले आहे. बोलणे साधे नसावे. बोलण्यात कवित्व असावे, कवित्वात रसिकता असावी आणि रसिकतेला परतत्त्वाचा स्पर्श व्हावा. मग ते बोलणे साधे राहत नाही, अतीव रसाळ आणि प्रतीतीचे बोलणे होते. त्याप्रमाणे आधीच सौंदर्य परंतु त्यातून परब्रह्माचे तेज फाकत असेल तर ते अतीव सुंदर होते. श्रीहरीचे तेजःपुंज सौंदर्य पाहताना ज्ञानदेवांची स्थिती कशी झाली? तर आकाशात आकाश सामावून जावे तसे श्रीहरीरूप त्यांच्या डोळ्यांत साठवले. आकाशात आकाश कसे सामावते? दुधात पाणी किंवा पाण्यात दूध सामावते तसे? दूध आणि पाणी दोन भिन्न द्रवपदार्थ आहेत. त्यांच्या कमी-अधिक मिश्रणाने दूध पाणचट होईल किंवा पाण्याला दुधाचा रंग येईल एवढेच. हे काही एकरूप होणे नव्हे. आकाशाचे तसे नाही. आकाश एकच आहे. भिंती बांधून घर उभे केले की आकाश वेगळे झाले आहे असे भासते. घरातले आकाश वेगळे आणि बाहेरचे आकाश वेगळे. भिंती पडल्या तर घरातले आकाश बाहेरच्या आकाशात कसे सामावून जाईल? सामावून जायला ते वेगळे होतेच कुठे? ते तर एकच होते. भिन्न भासत होते एवढेच. त्याप्रमाणे ज्ञानदेवांच्या डोळ्यांत श्रीहरी सामावला. आकाशात आकाश सामावून जावे तसा. ज्ञानदेवांच्या दिठीत असे अद्वैत संचलेले आहे.

त्याचे डोळे कसे कमळासारखे टपोरे. कमळाच्या पाकळ्या उमलाव्या तसे पूर्ण उघडलेले. कमळात असतो गंध आणि मध. त्यामुळेच तर भ्रमर कमळाकडे आकर्षित होतो. कमळाच्या प्रेमात पडतो. इतका की रात्री कमळ मिटल्यावर तो आत चुकून राहिला तर रात्रभर तेथेच राहतो, जीव देतो. परंतु कमळाची एवढीशी पातळ पाकळी छेदून तो बाहेर येत नाही, त्याच्याजवळ कोरडे काष्ठ भेदण्याचे सामर्थ्य असले तरी. प्रेमाची जाती ही अशी असते. कमळाच्या गंधाने आणि मधाने लावलेले हे वेड. श्रीहरीचे डोळेही भक्ताला असेच वेड लावतात. त्याच्या डोळ्यांत प्रेमाचा गंध आणि भक्तीचा मध भरलेला आहे. त्याच्या डोळ्यांतून प्रेम-भक्तीचा नित्य वर्षाव होत असतो. या प्रेम-भक्तीसाठीच तर भक्त आपला जीव गहाण टाकतात. श्रीहरीच्या ठायी सुंदर रूप आहे, प्रेमाचा गंध आहे आणि भक्तीचा रस आहे. भक्तीचा अवीट स्वाद चाखण्यासाठी संतांनी पुन्हा पुन्हा गर्भवास पत्करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. श्रीहरीचे रूप जसे सुंदर आहे तसेच सुगंधित आणि रसपूर्णदेखील आहे, याची ज्ञानदेवांना अनुभूती आलेली आहे.

त्याच्या डोळ्यांतल्या रस-गंधाने असे वेड लागले आहे की संसार सरला आणि व्यवहार थंडावला. चार भांडी मिळवून घरात थाटलेला आणि मुला-लेकरांची वीण वाढवत बसलेला संसार म्हणजे हा संसार नव्हे. ‘संसार’ म्हणजे जन्ममरणाचे अखंड भ्रमणारे चक्र. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननिजठरे शयनम्’ अशी शंकराचार्यांनी वर्णिलेली स्थिती म्हणजे ‘संसार’ होय. जन्म हवा पण मृत्यू नको, असे म्हणता येत नाही. वाढदिवसाला फुंकर घालून मेणबत्त्या विझवल्यावर आयुष्यातली एवढी वर्षे विझून गेली हे तत्त्व ज्याला कळते आणि वळते तो खरा तत्त्वज्ञ. सामान्य माणूस मात्र जन्माचा आनंद साजरा करतो आणि मरणाचे दुःख जन्मभर वागवत बसतो. त्याला जन्म हवा असतो, मरण नको असते. परंतु असे तर कधी घडले नाही. सूर्याने उगवायचे पण मावळायचे नाही, फुलाने उमलायचे पण कोमेजून जायचे नाही, हे कसे घडेल बरे? मावळणे नको असेल तर उगवणे नाकारायला हवे, कोमेजणे नको असेल तर उमलणे नाकारायला हवे. मरणे नको असेल तर जन्मणे टाळायला हवे. मरण नाकारून उपयोग नाही, जन्म नाकारणे महत्त्वाचे. जेव्हा मनुष्य जन्म नाकारतो तेव्हा त्याच्या ‘संसारा’चा संकोच सुरू होतो. ‘संकोचला संसार’ या ज्ञानदेवांच्या शब्दांचा अर्थ असा आहे. श्रीहरीशी एकरूप झाल्यावर संसार उरेलच कसा? आणि व्यवहार तरी कसा चालू राहील? व्यवहारासाठी द्वैत हवे असते, कोणी पाहणारा असतो, काही पाहण्याजोगे असते. अशावेळी पाहण्याचा व्यवहार घडत असतो. कोणी कर्ता असतो, काही करण्यासारखे असते, तेव्हा कर्मव्यवहार होत असतो. येथे तर द्वैत उरलेलेच नाही, मग कोणी कोणाशी व्यवहार करायचा? अशाप्रकारे सारा व्यवहार थांबला आहे आणि अंतर्यामी तर असा ब्रह्मानंद उचंबळतो आहे की सांगता सोय नाही. तेजाला तेजाचेच अंग असावे तसा अवघा देह ब्रह्मानंदमय होऊन गेला आहे. ब्रह्मानंदामुळे देहभावच उरला नाही तर देहभान कसे राहील? ज्योतीचा प्रकाश काचेतून बाहेर फाकावा तसा ज्ञानदेवांचा आत्मानंद त्यांच्या मनातून, शरीरातून आणि वाणीतून प्रकट झाला आहे.

या ब्रह्मानंदाची प्राप्ती ज्याच्यामुळे होते त्या परब्रह्म श्रीहरीचे गुणगान कसे करावे बरे? वेदांनी हा प्रयास करून पाहिला. खरे तर वेदवाणी ही अत्यंत मधुर. कारण तिचा वर्ण्यविषयच मुळी अतीव मधुर आहे. विश्‍वातले सारे माधुर्य ज्यापासून उत्पन्न झाले ते परतत्त्व काय कमी मधुर आहे? लाडवातली गोडी ही रव्याची, बेसनाची नसते तर ती त्यामधल्या साखरेची असते, हे शहाण्याला कळते. त्याप्रमाणे विश्‍वात जे माधुर्य प्रत्ययाला येते ते त्या परमात्म्याचे असते. अशा मधुर परतत्त्वाचे वर्णन करू पाहणारी, त्याला स्पर्श करणारी वेदवाणी मधुर असणार नाही तर काय! परंतु वेदवाणीसुद्धा त्याच्या गुणांचा शोध घ्यायला असमर्थ ठरली आणि त्याचे एवढे गुणवर्णन करूनदेखील अखेर ‘न इति न इति’- अजून संपले नाही, अजून संपले नाही- असे म्हणत मूक झाली. ज्याला ‘शब्दब्रह्म’ म्हणतात त्या वेदांची ही अशी अवस्था. तेथे आपण त्याच्याविषयी काय बोलावे? म्हणून यानंतर त्या श्रीहरीविषयी काही बोलणे म्हणजे न बोलल्यासारखेच आहे. परब्रह्माचे वर्णन करण्यापेक्षा स्वतः परब्रह्म होणे हे अधिक सोपे आहे. म्हणून त्या परब्रह्म श्रीहरीला मी माझे अंगच करून घेतले आहे, असे ज्ञानदेव म्हणतात.

परंतु ‘श्रीहरीचे अंग होणे’ घडते तरी कसे? तर ओठांनी त्याच्या पाठीशी लागल्यावर. ओठांनी त्याचा पाठलाग केल्यावर. ओठांनी पाठीशी लागणे म्हणजे त्याचे निरंतर नामस्मरण करणे. नामस्मरण हे प्रारंभी पोपटपंचीसारखे भासते, क्षुद्र पाठांतर वाटते. परंतु पुढे ते हळूहळू मनात उतरते, मनाला व्यापून टाकते. वाल्ह्याचा वाल्मीकी करण्याची किमया नामस्मरणात आहे. नाम घेत घेत श्रीहरीच्या पाठीशी लागल्यावर पुढे श्रीहरीचे रूपच नाम घेणार्‍याच्या पाठीशी लागते. ज्याचा आपण पाठलाग करावा तोच पुढे आपला पाठलाग करू लागतो, असा येथला उलटा प्रकार आहे. शिपाई होऊन ‘पंढरीच्या चोरा’ला धरायला जावे तर तोच आपल्या अवतीभोवती सर्वत्र वावरत आपल्याला नजरकैदेत ठेवतो. म्हणून ओठांनी पाठलाग केल्यावर श्रीविठ्ठलाची भेट झाली, असे कृतार्थ उद्गार ज्ञानदेवांनी काढले आहेत.
ज्ञानदेवांचा हा अभंग म्हणजे एक आत्मसंवाद आहे. भूक भागल्यावर देखील वासराने गायीच्या आचळाशी लडिवाळ सलगी करावी तसा हा अभंग. ज्ञानदेव स्वतः पूर्ण तृप्त आहेत आणि अशा उच्च भूमिकेवर आरूढ झालेले आहेत की जेथे शब्दांचे काम नाही. परंतु कारण नसताना बोलत राहणे आणि जे रूप पाहिले ते पुन:पुन्हा पाहणे अशी प्रेमाची रीतच असते. तान्ह्या बाळाकडे कितीही टक लावून पाहिले तरी आईचे मन भरत नाही. मातृत्वाने कृतार्थ होऊन देखील ती बाळाकडे एकटक बघत, त्याचे कौतुक करीत जणू मायपणाचे सुख पुन:पुन्हा भोगत असते. ज्ञानदेवांची अवस्था अशीच झाली आहे. आत्मानुभवाने कृतार्थता लाभलेली, तरी अभंगाचे निमित्त करून आत्मसंवाद करीत ते अद्वैतानंद पुन:पुन्हा अनुभवत आहेत, असे सारखे वाटत राहते.

@ शे. दे. पसारकर 
1997 

No comments:

Post a Comment