Thursday, February 7, 2019

७. कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु


पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळा फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेज:पुंजाळलें । न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु । येणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी । आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादु । हें तव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणे खुंटलें । वैखरी कैसेंनि सांगे ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे । उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठीमोरा न कळे । ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तवं मीचि मी एकली । आसावला जीव राहो ॥५॥
बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी । अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळां पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥६॥

भावार्थ
या पांडुरंगाचे अंग दिव्य तेजाने कसे झळकत आहे पाहा. जणू रत्नांचे तेजच सर्वत्र फाकले आहे. येथे जे तेज:पुंज लावण्य प्रकटले आहे त्याचे वर्णनच करता येत नाही.(१) जाणण्यास कठीण असलेला हा विठ्ठल कर्नाटकातला असून ज्याने मला वेध लावला आहे, तो खोळ पांघरून मला खुणावून बोलवीत आहे. परंतु आळवल्यावर मात्र साद देत नाही.(२) याच्याशी शब्दांशिवाय संवाद करावा लागतो, दुजेपणा न ठेवता बोलावे लागते हे किती गंमतीचे आहे बरे! याच्याशी बोलताना परावाणी थकून जाते, तेथे वैखरीचा काय पाड?(३) याच्या पाया पडायला जावे तर त्याचे पाऊलच दिसत नाही, दृष्टिसमोर मात्र उभा असलेला दिसतो. हा समोर आहे की पाठीमागे आहे हेच कळत नाही, असा भ्रम कसा झालाय कुणास ठाऊक!(४) याला मिठी मारण्यासाठी माझा जीव उतावळा होतो, त्यासाठी माझे बाहू स्फुरण पावतात. त्याला कडकडून मिठी मारायला जावे तर समोर कुणीच नाही, मी एकटीच उभी आहे, असा अनुभव येतो. त्याच्या भेटीसाठी माझा जीव किती आशा लावून बसला आहे!(५) हा बाप, रखुमादेवीचा पती माझ्या हृदयातच आहे असे जाणून त्याचा अनुभव घेण्याचा मी निश्‍चय केला. ज्ञानदृष्टीने त्याला पाहायला गेले तर माझ्या अंत:करणात एकाएकी पालट होऊन तो मला सापडला.(६)

विवरण
श्रीविठ्ठलाच्या तेजस्वी रूपाचे, त्याच्या झळाळणार्‍या अंगकांतीचे बहारदार वर्णन ज्ञानदेवांनी या अभंगात केले आहे. हे जसे विठ्ठलाचे वर्णन आहे तसेच ज्ञानदेवांच्या पालटलेल्या अंत:करणाचेही आहे. हा सावळा विठ्ठल ज्ञानदेवांना किती रूपांनी भेटतो आहे! कधी रत्नकांतीसारखे तेजस्वी रूप घेऊन, तर कधी आपले अगम्यत्व जपत ‘कानडा’ होऊन. कधी विश्‍वाची खोळ पांघरून लपत-खुणावत, तर कधी आळवल्यावर साद न देण्याचा हटवादीपणा करत. समोर उभा असूनही ‘समोर की पाठमोरा’ असे संभ्रमात पाडत ठकवून तर कधी उतावीळपणे क्षेम देताना अदृश्य होऊन. असे या विठ्ठलाचे लीलालाघव! त्याला पाहता पाहता अंत:करण कसे पालटून जाते आणि ‘मीचि मी एकली’ असा एकत्वाचा अनुभव कसा येतो, हे ज्ञानदेवांनी या अभंगात वर्णिले आहे. भक्त आणि भगवंत यांच्यातील अद्वैताचे एवढे प्रत्ययकारी चित्रण अन्यत्र क्वचितच आढळेल.

या अभंगाचे एक वैशिष्ट्य असे की येथे ज्ञानदेव ‘स्त्री’ होऊन अद्वैताचा आनंद अनुभवत आहेत. ‘पाया पडूं गेले’- ‘क्षेम देऊं गेलें तवं मीचि मी एकली’- ‘दृष्टीचा डोळां पाहो मी गेलीये’ हे शब्दसमूह त्यांच्या स्त्री-भूमिकेचेच सूचन करतात. आपले पाहणे-वागणे-बोलणे-लिहिणे सारे ‘पुरुषी’ आहे. अगदी आत्म्याला सुद्धा सांख्य तत्त्वज्ञानाने ‘पुरुष’ अशी संज्ञा दिली आहे. ‘पुरुषार्थ’, ‘पौरुष’ या शब्दांतही ‘पुरुष’ दडलेला आहे. ऋषी, योगी, भक्त, संत हे सारे शब्द पुरुषवाचक आहेत. ज्ञानानुभवाच्या पातळीवर देखील माणूस आपले ‘पुरुषपण’ विसरत नाही. अनुभवाच्या प्रकटीकरणाची भाषादेखील पुरुषी असते. ज्ञानदेव जेव्हा स्त्री होऊन अनुभव घेतात आणि तसाच तो व्यक्त करतात तेव्हा हे सारे पुरुषही वर्चस्व ते नाकारत नाहीत ना? असे वाटत राहते. आपल्यातला पुरुषभाव क्षीण करण्याचा तर हा प्रयास नव्हे? उंबरठ्याच्या आत चिणलेली स्त्रीची करुण कहाणी आणि स्त्रीत्वाच्या नावाने शिमगा करणारे पुरुषी निसुगपण त्यांना चांगले परिचित असावे. पितृत्व सहज नाकारता येते पण मातृत्व कदापि नाकारता येत नाही, हे नैसर्गिक सत्य त्यांना ज्ञात होते. स्त्रीचा विलक्षण हळवेपणा आणि अनुभवाची प्रगाढता यांमुळे ज्ञानदेवांनी स्त्रीची भूमिका घेतली हे खरे असले तरी त्यातून पुरुषी व्यवस्थेविरुद्ध एक विद्रोहाचा सूर मंदपणे निनादत आहे, असे सारखे वाटत राहते. ज्ञानदेवांच्या संयमाला शोभेसा त्यांना क्रांतिकारकत्वाचा हा आणखी एक पैलू.

ज्ञानदेवांच्या दृष्टिपुढे सावळा पांडुरंग उभा आहे. विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळाळत असलेली त्यांना दिसते. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले आहे. त्यांची दृष्टी ज्यावर पडते ते दिव्य तेजाने झळाळून जाते. येथे तर तेजाचे तेज असलेला पांडुरंग विटेवर उभा आहे. त्याच्या तेजःपुंज लावण्याची शोभा काय वर्णावी? त्यासाठी शब्द अपुरे पडतात. विठूचे हे सौंदर्य अगणित, असीम आहे आणि तेजःपुंजाळलेले आहे, प्रकाशाचे अंग प्रकाशाचेच असते त्याप्रमाणे.
हा विठ्ठल कसा आहे? तर कानडा आणि कर्नाटकी. ‘कानडा’ याचा एक अर्थ कन्नड भाषा बोलणारा असा आहे तर दुसरा अर्थ ‘अगम्य’ असा आहे. ‘विठ्ठल कानडे बोलु जाणे । त्याची भाषा पुंडलीक नेणे’ असे नामदेवांनी म्हटले आहे. ‘कर्नाटकु’ या शब्दाचेही असेच दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे ‘कर्नाटक प्रांतातला’ तर दुसरा अर्थ आहे ‘नाटकी, करणी करणारा’ (करनाटकी). कन्नड आणि कर्नाटक यांच्याशी विठ्ठलाचा पूर्वापार संबंध असला तरी येथे ज्ञानदेवांना त्याचे अगम्यत्व आणि नाटकीपण सांगायचे आहे. हा विठ्ठल नाटकी आहे तसाच कानडा म्हणजे न कळणारा असा आहे. त्याचे सगुण-साकार रूप हे नाटक नाही तर दुसरे काय आहे? ठसठशीतपणे अनुभवाला येणारे हे विश्‍व, पशु-पक्षी-माणूस, सारे स्थिरचर... हे नाटकच चाललेले आहे. सगळ्यांच्या भूमिका हाच नाटकी विठ्ठल करीत आहे. त्याच्या या नाटकीपणानेच तर मी मोहून गेले आहे. या नाटक्याने मला असा वेध लावला आहे की सांगता सोय नाही. त्याच्या नाटकाला अंतपार नाही. तो या सगुण-साकार विश्‍वाचे पांघरूण आपल्या निर्गुण-निराकार अंगावर घेऊन बसलाय हळूच खुणावत. या विश्‍वामागे लपून तोच खुणा करून बोलावतो आहे एखाद्या लबाड मुलासारखा. ‘माझ्याकडे पाहा, मला ओळख’ असे खुणावतो तर आहे. पण हाक मारल्यावर मात्र ओ देत नाही. असा हा नाटकी. त्याच्या नाटकाबद्दल किती सांगावे! त्याच्या या नाटकीपणामुळेच तर तो ‘कानडा’ आहे. कळायला मोठा कठीण आहे.

याच्याशी संवाद करायचा तो शब्दांशिवाय. याच्याशी बोलायचे ते दुजेपण टाकून, हे कसे वाटते बरे? पण आहे मात्र खरे. बोलण्यापेक्षा अबोलणे बरेच काही सांगून जाते. प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत? आईने मुलाला ‘बाळा, तुझ्यावर माझे फार फार प्रेम आहे’ असे सतत म्हटले तरच तिचे प्रेम व्यक्त होते का? न बोलताही तिच्या दृष्टीत वात्सल्य ओथंबून राहिलेलेच असते. म्हणून या विठ्ठलाशी मौनाने बोलावे लागते, अन् तेही बोलणारा आणि ऐकणारा हे द्वैत सांडून. आपला प्रतिध्वनी आपणच ऐकावा तसे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी अशा चतुर्विध वाणी आहेत. वैखरी ही बाह्य वाणी. वैखरी म्हणजे शब्दांत बोलणे. विचार करताना आपण आपल्याशी बोलत असतो, ती मध्यमा वाणी. तिच्या पलीकडे हृदयाची भाषा असते. ती हृदयालाच कळते, ती पश्यंती वाणी आणि आत्म्याच्या अत्यंत समीप असणारी, त्याच्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परावाणी. अशी परावाणीदेखील या विठ्ठलाशी बोलताना मूक होते. बोलणे खुंटते. शब्दांवाचून संवाद कसा होतो, दुजेपणाशिवाय बोलणे कसे होते, हे जेथे परावाणीला सांगता येत नाही, तेथे वैखरीला कसे बरे सांगता येईल?

या विठ्ठलाचा नाटकीपणा आणखी किती सांगू? त्याच्या पायावर डोके ठेवायला जावे तर त्याचे पाऊलच दिसत नाही. समोर पाहावे तर तो हसत उभा असतो. याच्या रूपाला अंत ना पार. त्याचे पाऊल सापडेल तरी कसे? हा समोर आहे की पाठमोरा हेच कळत नाही. हा मला समोरून दिसत आहे की मी याची पाठीमागची बाजू पाहते आहे? हा माझ्यासमोर उभा आहे की माझ्या पाठीमागे उभा आहे? अशा संभ्रमात याने मला पाडले आहे. अशाप्रकारे हा मला सारखा ठकवतो आहे. हे विश्‍व याचेच रूप. ते आपण पुढून पाहतोय की मागून? खालून पाहतोय की वरून? काय समजावे बरे? आपल्या अवतीभोवती सर्वत्र तोच व्यापून राहिलेला आहे एवढे मात्र खरे.

त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला. त्यासाठी माझे बाहू स्फुरण पावताहेत. मला वाटले हा एवढासा विठ्ठल. त्याला मिठी मारणे किती सोपे. अशा विचाराने त्याला मिठीत घ्यायला गेले तर मीच एकटी उरले. हा नाटकी कुठे विरून गेला कुणास ठाऊक? त्याला आलिंगन देण्याची माझी आस अपुरीच राहिली. हा विठ्ठल बाहेर नसून हृदयात वसतो आहे असे मला कळले तेव्हा त्याचा अनुभव घ्यायचे मी ठरवले. मग मी दृष्टी आत वळवून पाहिले तर काय, माझे अंतरंगच बदलून गेले! आत तोच, बाहेर तोच. समोर तोच, मागे तोच. देह तोच, आत्मा तोच. जिकडे पाहावे तिकडे तोच. विश्‍वात तोच, विश्‍वापलीकडे तोच. नाना रूपे घेऊन, नाना मुखवटे धारण करून त्याचे नाटक सुरूच आहे. वरवर पाहायला जावे तर कसा कमरेवर हात ठेवून विटेवर निश्‍चल उभा आहे! जणू काहीच करीत नाही. जणू कुणाचे काही घेणे-देणे लागत नाही. भोळा सांबच जसा. अरे, तुझ्यासारखा दुसरा नाटकी मी पाहिला नाही. विश्‍वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस, माझ्यासारखीला दुरून काय खुणावतोस, हाक मारल्यावर गप्प काय राहतोस, पाया पडायला आले तर पाऊल काय लपवतोस, समोर-मागे येऊन काय ठकवतोस, क्षेम द्यायला जाताच हृदयात काय लपतोस! कळली तुझी सारी नाटके! तू पक्का ‘करनाटकी’ आहेस आणि न कळणारा असा ‘कानडा’ आहेस हे आता पुरते कळले. बरं का!

ज्ञानदेव स्त्रीभावाने सर्वव्यापी विठ्ठलाशी असे बोलत राहतात. हे बोलणे म्हणजे एका अंगाने त्याच्याविषयी तक्रार आहे तर दुसर्‍या अंगाने त्याचा गुणगौरव आहे. एका अर्थाने हे विठ्ठलाच्या तेजःपुंज सगुण-निर्गुण रूपाचे वर्णन आहे, तर दुसर्‍या अर्थाने ज्ञानदेवांच्या पालटलेल्या अंतरंगस्थितीचे चित्रण आहे. ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव, त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यमय रीतीने शब्दबद्ध झाला आहे. पहिल्या कडव्यात विठ्ठलाचे तेजःपुंज रूप, दुसर्‍यात खोळबुंथी घेऊन खुणावणारे त्याचे नाटक, तिसर्‍या कडव्यात शब्दांपलीकडे असलेली त्याची भाषा, चौथ्यात समोर-मागे ठकवणारे त्याचे सर्वव्यापी अगम्य रूप, पाचव्या कडव्यात त्याला आलिंगन देताना अनुभवाला येणारे अद्वैत आणि सहाव्यात त्या हृदयस्थाचा साक्षात्कार झाल्यावर पालटलेले अंतरंग या सार्‍याचे ज्ञानदेवांनी अत्यंत रेखीव वर्णन केले आहे.
शे. दे. पसारकर
1997

1 comment: