ज्ञानदेवांच्या अभंगाचे विवरण
६. बरवा वो हरि बरवा वो
बरवा वो हरि बरवा वो ।
गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥
सांवळा वो हरि सांवळा वो ।
मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥२॥
पाहातां वो हरि पाहातां वो ।
ध्यान लागलें या चित्ता वो ॥३॥
पढिये वो हरि पढिये वो ।
बाप रखुमादेविवरु घडिये वो ॥४॥
भावार्थ
हा श्रीहरी अत्यंत चांगला आहे. हाच गोविंद आहे, हाच गोपाळ आहे. याचे गुण किती थोर आहेत हो.(१) या हरीचा वर्ण सावळा आहे. हा कान्हा, गायी राखणारा गोपाळ मदनालाही मोहित करणारा आहे हो.(२) या हरीला पाहता पाहता माझ्या चित्ताला त्याचेच ध्यान लागून राहिले.(३) असा हा प्रिय श्रीहरी, हा बाप, रखुमादेवीचा पती श्रीविठ्ठल मला घडीघडी आवडतो हो.(४)
विवरण
ज्ञानदेवांचा हा अभंग म्हणजे एक लयबद्ध भावकविताच आहे. वार्याच्या झुळुकीने वेल मंदपणे डोलत राहावी तसे हा अभंग वाचताना आपण डोलू लागतो. कवितेत एक अंतर्गत लय असते तशीच तिच्या बाह्य रूपात- शब्दरचनेत देखील एक लय असते. या अभंगात बरवा, सांवळा, पाहाता, पढिये या शब्दांच्या पुनरावर्तनाने ज्ञानदेवांनी अशी लय साधली आहे की अभंग वाचताना, गुणगुणताना हात नकळत ताल धरू लागतात. श्रीहरीचे रूप पाहिल्यावर ब्रह्मानंदी टाळी लागेल तेव्हा लागेल, परंतु अभंग वाचताक्षणी हातांची टाळी मात्र लगेच वाजू लागते. बरवा-गरुवा, सावळा-गोवळा, पढिये-घडिये अशा यमकांनी अभंगातली लय वाढत जाते आणि ‘वो’च्या आवर्तनाने ती अधिक गडद होते. भावकवी म्हणून ज्ञानदेवांचे अभंगाच्या आशयाकडे जेवढे लक्ष आहे तेवढेच अभंगाच्या बाह्य रूपाकडे देखील आहे. हृदयातला आशय-अनुभव अमूर्त असतो आणि तो शब्दांद्वारेच मूर्त होत असतो. म्हणून शब्दांचे देखणेपण, त्यांची योजना-आवर्तने यांविषयी ज्ञानदेव अतिशय सजग, सावध आहेत. ज्ञानदेवांची दृष्टी सौंदर्यशोधक आहे. तिला अमूर्तातले सौंदर्य दिसते तसेच मूर्तातलेही सौंदर्य दिसते. अभंगाच्या आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांकडे ते सौंदर्यवादी दृष्टीने पाहत आहेत.
वृंदावनात गायी राखणारा गोपालक श्रीहरी म्हणजे मूर्तिमंत सौंदर्यच! परब्रह्माचे सगुण सावळे रूप. परमात्म्याची निर्गुण आणि सगुण दोन्ही रूपे ज्ञानदेवांना प्रिय आहेत. निर्गुण-निराकार त्यांचा चिंतनविषय आहे तर सगुण-साकार प्रेमविषय. विश्वरूपाने विलसणारे परब्रह्म त्यांना प्रेमास्पद वाटते.
जालेंनि जगें मीं झाकें । तरी जगत्वे कोण फांके ।
किळेवरी माणिकें । लोपिजे काई ॥१४-१२३॥
असे ‘ज्ञानेश्वरी’त श्रीकृष्णाच्या मुखातून त्यांनी वदविले आहे. रत्नाची प्रभा रत्नाला झाकत नसते तर
प्रकट करीत असते, त्याप्रमाणे हे दृश्य जग परब्रह्माला झाकून टाकत नसून त्याला प्रकट करीत आहे.
ज्ञानदेवांची ही भूमिका समजून घेतली की मग ते संप्रदायाने निर्गुणोपासक असूनही सगुणावर एवढे
उत्कट प्रेम का करतात हे लक्षात येते.
प्रकट करीत असते, त्याप्रमाणे हे दृश्य जग परब्रह्माला झाकून टाकत नसून त्याला प्रकट करीत आहे.
ज्ञानदेवांची ही भूमिका समजून घेतली की मग ते संप्रदायाने निर्गुणोपासक असूनही सगुणावर एवढे
उत्कट प्रेम का करतात हे लक्षात येते.
ज्याच्या ठायी समग्र सौंदर्य एकवटलेले आहे असा श्रीहरी ज्ञानदेवांच्या भावविश्वात जागा झाला आहे. श्रीविठ्ठल हे त्याचेच रूप. तो निर्गुणच इथे सगुण झाला आहे. तो अरूपच इथे रूप घेऊन उभा आहे. त्याचे ‘बरवेपण’ काय सांगावे? ते पाहण्यासाठी कष्ट पडत नाहीत. पापण्या उघडल्या की हे सावळे सुंदर रूपडे दृष्टिसमोर उभे राहते. ते जणू डोळ्यांना आलिंगनच देते. म्हणून त्याचे सौंदर्य पाहताच ज्ञानदेवांची वाणी ‘बरवा वो हरि बरवा वो’ असे गुणगुणत राहते. याचे गुण किती थोर आहेत पाहा. कर्तृत्व, नियंतृत्व, भोक्तृत्व, विभुत्व, साक्षित्व आणि सर्वज्ञत्व हे षड्गुण याच्या ठिकाणी आहेत. विश्वातील समस्त कर्मांना हा प्रेरणा देतो. सर्व ब्रह्मांडांचे नियंत्रण करतो, शरीरात जीवरूपाने राहून सुखदुःखे भोगतो. हा सर्व विश्वाला व्यापून उरला आहे, हा सर्व जगव्यवहाराचा साक्षीदार आहे आणि हा सर्वज्ञ, सर्वज्ञानी आहे. त्याच्या अनंत ज्ञानाशी कोणी बरोबरी करू शकत नाही. सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्या पलीकडे असलेला हा निर्गुण श्रीहरी असा स-गुण झाला आहे. सौंदर्य आणि गुण यांचा सुरेख संगम याच्या ठिकाणी झाला आहे. श्रीहरीचे सौंदर्य हे ईश्वरी सौंदर्य आहे. ते मानवी सौंदर्यासारखे क्षणभंगुर नाही. कालची लावण्यवती आज चेहर्यावर सुरकुत्या घेऊन हातातली काठी टेकत चालत असते. परंतु श्रीहरीचे सौंदर्य कालातीत आहे. ते ढळणारे नाही. कोणत्याही काळात, कोणत्याही प्रांतात ज्या कुणाच्या मनात भक्तीचा उदय होईल याच्या दृष्टिपुढे श्रीहरीचे हेच सौंदर्य प्रकट होईल.
श्रीहरी सावळ्या रंगाचा आहे. तो मेघश्याम आहे. सावळा मेघ सहस्रधारांनी बरसून भूमीला सुजलाम् सुफलाम् करतो. मेघासारखा उदार कोणी नाही. निरपेक्षपणे तो सतत देतच असतो. त्याच्या बरसण्याने असंख्य जिवांचे पोषण होते. श्रीहरीचा वर्ण मेघाप्रमाणे सावळा आहे. याचा अर्थ तो मेघासारखा उदार आहे. चातकाची तृषा एका पाऊसथेंबाएवढी. तो मागतो थेंबभर पाणी, पण मेघ देतो सहस्रधारा. अवघ्या भूमीला भिजवून चिंब करणार्या. विटेवरला श्रीहरीही असाच मेघोदार आहे. त्याला मागून तर पाहा. तो इतके देईल की ते जन्मभर पुरून उरेल. मात्र मेघाची कृपा हवी असेल तर चातक होता आले पाहिजे. श्रीहरी-माऊलीचा पान्हा हवा असेल तर तिचा तान्हा होता आले पाहिजे.
श्रीहरी सावळा असला तरी तो मदनालाही मोहित करणारा मोहन आहे. मदनाने तर सार्या जीवमात्रावर आपली विलक्षण मोहिनी घातलेली आहे. क्षणिक सुखासाठी त्याने युगायुगांची आयुष्ये गहाण ठेवून घेतली आहेत. राव असो की रंक, वज्रदेही भीमकाय असो की पाप्याचे पितर, सारेच या मदनाने दाखवलेल्या अतृप्त क्षणामागे धावत सुटलेले दिसतात. ज्ञानी-अज्ञानी, सज्जन-दुर्जन या सगळ्यांना मदनाने आपल्या दावणीला बांधलेले आहे. जन्मभराच्या तपस्येवर पाणी सोडून विश्वामित्र मेनकेच्या मागे धावत सुटतो, असा या मदनाचा प्रताप आहे. त्याला नाव कोणतेही द्या, पण तोच सार्या जगाला आपल्या भोवती नाचवतो आहे. असा अवघ्या जगाला मोहित करणारा प्रतापी मदन, पण त्यालाही हा श्रीहरी मोहित करतो. मदनाचे सर्व सामर्थ्य श्रीहरीपुढे निष्प्रभ होते.
हा कान्हा गायी राखणारा गोपाळ आहे, असे ज्ञानदेव वर्णन करतात. राखणे म्हणजे नियंत्रण ठेवणे, गायींच्या मागे रानोमाळ धावणे नव्हे. त्याच्या मुरलीच्या स्वरात गायी नियंत्रित करण्याचे सामर्थ्य आहे. मग या गायी म्हणजे विषयांपाठी धावणारी इंद्रिये असतील किंवा चंचल अशा अनावर चित्तवृत्ती असतील.
या श्रीहरीला पाहता पाहता ज्ञानदेवांचे नेत्र अलगद मिटतात आणि त्यांना या सावळ्या सुंदराचे ध्यान लागून राहते. आता डोळे उघडणे-मिटणे ही केवळ एक क्रिया उरली आहे. त्या सगुण-निर्गुण रूपाशी ज्ञानदेवांचे चित्त असे एकाकार झाले आहे की पाहते आणि पाहणे हा भेदच विरून गेला. सामान्य माणसाच्या लेखी डोळे उघडणे आणि डोळे मिटणे ही केवढी महत्त्वाची क्रिया असते! त्याचे डोळे उघडे असतील तेव्हा तो हे विश्व पाहत असतो आणि त्याचे डोळे जेव्हा बंद होतात तेव्हा तो मनोविश्व पाहत असतो. डोळे उघडून तो जेवढे पाहतो त्यापेक्षा डोळे बंद करून अधिक पाहत असतो. त्याच्या उघड्या डोळ्यांपुढील जग आणि मिटलेल्या डोळ्यांपुढील जग वेगळे वेगळे असते. परंतु ज्ञानदेवांनी डोळे उघडले काय किंवा डोळे मिटले काय, त्यांच्या दृष्टीसमोर तोच गोविंद, गोपाळ उभा आहे. आत एक आणि बाहेर एक असे दुभंगलेपण त्यांच्या दृष्टीत उरलेले नाही. त्यांच्या चित्तात तो एक गोविंदच भरून राहिला आहे. त्यांना अंतर्बाह्य व्यापून राहिला आहे.
ज्ञानदेवांच्या प्रीतीचा आता एकच विषय आहे. विठ्ठलरूपाने उभा असलेला हा सावळा-श्रीहरी. त्यांचे एकमेव प्रेमास्पद हेच. त्यांच्या जीवीची आवड विठ्ठलाच्या ठिकाणी स्थिर झाली आहे, एकवटली आहे. त्यांची प्रीती आहे शाश्वतावर, चिरंतनावर. कुणाला कशाची तर कुणाला कशाची आवड असते. कुणाला आवड असते चिखलातून उगवलेल्या कमळाची तर कुणाला कमळाखालचा चिखल चिवडण्याची. कुणी सूर्योन्मुख होऊन आपल्या पंखातले बळ अजमावून पाहतो तर कुणी उंच भरारी घेऊनही भूमीवरचे नासलेपण न्याहाळत बसतो. परंतु बुद्धी आणि भावना प्रगल्भ झाली की माणूस अस्थिरामागील स्थिराचा, अशाश्वतामागील शाश्वताचा शोध घ्यायला प्रवृत्त होतो. आहे त्यात मन रमेनासे झाले की एखादा राजपुत्र सुस्वरूप पत्नीचा आणि लाडक्या गोंडस बालकाचा त्याग करतो, हात जोडून उभी असलेली सारी सुखे लाथाडतो आणि शाश्वत सत्याचा शोध घेऊन ‘बुद्ध’ होतो. ‘बद्धा’चा ‘बुद्ध’ होणे हेच मानवी जीविताचे सार आहे.
ज्ञानदेवांना बालपणीच सर्वज्ञतेने वरले होते. सिद्धप्रज्ञेच्या लाभाने त्यांंचे मन सारस्वताने दुभत होते. श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या कृपेने आणि आत्मसाक्षात्काराने त्यांचे जीवन उजळून गेले होते. त्यांच्या दृष्टीत शाश्वत-अशाश्वत असा भेद उरला नव्हता. त्यांच्या समोर जे काही होते ते सारे शाश्वताचे सुरूप. खरे तर शाश्वत-अशाश्वत, सगुण-निर्गुण ही भाषा सामान्यांची आहे, सामान्यांसाठी आहे. अंधार समजल्याशिवाय प्रकाश कशाला म्हणतात ते कळत नाही. अज्ञानाचे रूप समजल्यावाचून ज्ञान कशाला म्हणतात ते कळत नाही. ही मानवी बुद्धीची मर्यादा आहे. म्हणून सामान्याला सगुण दाखवून निर्गुणाची कल्पना द्यावी लागते. आकार दाखवून निराकार समजून घ्यावे लागते. परंतु ज्ञानदेवासारख्या आत्मसाक्षात्कारी योगिपुरुषाची दृष्टी ‘सगुण निर्गुण दोन्हीं विलक्षण। ब्रह्म सनातन विठ्ठल हा॥’ अशी व्यापक झालेली आहे. म्हणून सावळा विठ्ठल त्यांना अत्यंत प्रिय आहे. कारण तो सगुण-निर्गुणाच्या पलीकडे असलेले सनातन ब्रह्म आहे. त्याची आवड क्षणोक्षणी वृद्धिंगत होत आहे. ‘पढिये वो हरि पढिये वो।’ अशा लयबद्ध शब्दांत ज्ञानदेवांनी आपल्या जीवीची आवड व्यक्त केली आहे. श्रीहरीचे देखणे रूप, त्याचे सगुणत्व, मदनाला मोहित करणारी त्याची मोहनशक्ती आणि त्याला पाहिल्यावर झालेली भावावस्था यांचे नेटके चित्रण ज्ञानदेवांनी या अभंगात केले आहे.
@ शे. दे. पसारकर
1997

