Tuesday, December 11, 2018

अमृताचा घनु


ज्ञानदेवांच्या अभंगाचे विवरण

४. कल्पद्रुमातळीं वेणु वाजवितु आहे


त्रिभंगी देहुडा ठाण मांडूनियां माये ।
कल्पद्रुमातळीं वेणु वाजवितु आहे ॥१॥
गोविंदु वो माये गोपाळु वो ।
सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु वो ॥२॥
सांवळे सगुण सकळां जिवांचे जीवन ।
घनानंद मूर्ति पाहतां हारपले मन ॥३॥
शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ ।
बाप रखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥४॥

भावार्थ
जो तीन ठिकाणी एका पायाला बाक देऊन, एक पाय सरळ आणि दुसरा पाय वाकडा ठेवून दिडक्या पायावर उभा आहे आणि कल्पवृक्षाखाली मुरली वाजवीत आहे.(१) तो गोविंद, तो गोपाळ आहे ग माय. त्याच्या ठायी अंतर्बाह्य परमानंद भरून राहिलेला आहे.(२) ते सावळे, सगुण रूप सर्व जिवांचे जीवन आहे. त्याची आनंदघन मूर्ती पाहताच माझे मन हरपून गेले.(३) हा बाप, रखुमादेवीचा पती श्रीविठ्ठल शून्य, स्थावर, जंगम या सर्वांना व्यापून राहिलेला असून कुणालाही न कळणारा आहे.(४)

विवरण
श्रीविठ्ठलाच्या रूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच सगुण-साकार होऊन विटेवर उभे राहिले आहे, अशी श्रद्धा ज्ञानदेवांचा मनीमानसी नांदत आहे. म्हणून परब्रह्माची जेवढी साकार रूपे आहेच ती सारी विठ्ठलाच्या ठायी पाहता येतात. परमात्म्याचे कृष्णरूप तर अवघ्या भक्तांचा, संतांचा प्रेमविषय. त्याच्या मेघश्याम रूपाकडे कितीही पाहत राहिले तरी धणी पुरत नाही. त्याच्या लीलावताराच्या कथा कितीही ऐकल्या तरी सरत नाहीत. त्याच्या चरित् कहाणीतल्या लीलालाघवाने अवघ्या भक्तांची मने मोहून गेलेली. मग ज्ञानदेवासारख्या हळुवार वृत्तीच्या भावकवीला कृष्णरूप भावले नाही तरच नवल! संतांच्या दृष्टीने विटेवरला विठ्ठल हा कृष्णाचे बालरूप आहे. विठ्ठलाची मूर्ती आणि तिच्याशी संबंधित कथा-गाथादेखील तिचे कृष्णरूपत्व गर्जून सांगतात. ‘वामांगी रखुमाई’ घेऊन उभा असलेला विठ्ठल हा मुळात गोपजनांचा देव श्रीकृष्ण आहे आणि वृंदावनातील क्रीडारत सवंगड्यांकडे  कौतुकाने पाहात कमरेवर हात ठेवून उभे राहावे तसाच जणू भक्तांकडे पाहात तो विटेवर उभा आहे. विठ्ठलाकडे पाहता पाहता ज्ञानदेवांचा हृदयात मुरलीमनोहराचे रूप कसे जागे होते, त्याच्याठायी अंतर्बाह्य भरून राहिलेल्या परमानंदाचा त्यांना कसा अनुभव येतो, त्याची आनंदघन मूर्ती पाहून त्यांचे भान कसे हरवते आणि सर्वव्यापक, अनाकलनीय असा परब्रह्मरूप श्रीकृष्ण विठ्ठलाच्या रूपाने त्यांच्या दृष्टिपुढे कसा उभा राहतो, याचे प्रत्ययकारी चित्रण या अभंगात ज्ञानदेवांनी केले आहे.

ज्ञानदेवांना कृष्ण दिसतो तोच मुळी त्रिभंगी देहुडा. देहुडा म्हणजे वक्र, वाकडा. मांडी, गुढगा आणि पाऊल अशा तीन ठिकाणी त्याने आपला एक पाय वाकवलेला आहे. तो पाय त्याने दुसर्‍या सरळ पायाजवळ वाकडा ठेवला आहे. असा दिडक्या, दीड पायावर उभा राहून तो अत्यंत तन्मयतेने मुरली वाजवीत आहे. मुरली वाजवणार्‍या कृष्णाचे हे देहुडे ध्यान कृष्णभक्तांच्या हृदयात घर करून राहिले आहे. कृष्णाचे उभे राहणे हेच मुळात आकर्षक आहे. आपले सारे शरीरसौंदर्य प्रकट करीत पुरुषाने कसे उभे राहावे याचे हे उत्तम उदाहरण होय. हे केवळ उभे राहणे नव्हे तर जणू एक नृत्यमुद्रा आहे. स्त्रीचे शरीरसौष्ठव तिच्या प्रत्येक हालचालीतून निसर्गतः सहज प्रकट होत असते, तसे पुरुषाचे होत नाही. तो नृत्य करतो तेव्हाच त्याचे देहलावण्य दिसू लागते. कृष्ण मात्र, एक पाय वाकडा ठेवून ओठाजवळ मुरली धरून असा वक्राकार उभा राहिला आहे की नृत्य न करताही त्याचे शरीरसौष्ठव सहज प्रकट व्हावे.

कृष्णरूप मोठे विलोभनीय आहे. त्याच्या मुखावर तर सौंदर्याची कळा पसरलेली आहेच, परंतु गोकुळात दूध-लोणी खाऊन आणि सवंगड्यांसह हमामा-हुतूतू खेळून त्याने शरीरही कमावलेले आहे. तो पुरुषसौंदर्याचा आदर्श आहे. जीवनाची सर्व अंगोपांगे त्याच्या आयुष्याला स्पर्शून गेली. म्हणून तो पूर्णावतार ठरला. गोकुळात लोणी चोरणारा तो ‘माखनचोर’ आहे तसाच गोपींची मने हरण करणारा हृदयचोरही आहे. जरासंधासमोर मथुरा सोडून तो पळत सुटला आणि महाभारत युद्धात पांडवांचा पाठीराखा म्हणून समर्थपणे उभा राहिला. ओठांवर मुरली धरून तो जीवनावर, कलेवर प्रेम करण्याची दीक्षा देतो तसाच रणांगणावर गीता सांगून दुष्टशक्तीला शिक्षा करावी असेही सुचवतो. कुरुक्षेत्रावर तो सार्‍यांचा काळ ठरला आणि एका व्याधाच्या विषभरल्या बाणाने त्याने मृत्यू पत्करला. कृष्ण हा असा पूर्णावतार आहे. त्याने सौंदर्यावर आणि कलेवर प्रेम केले. त्याच्या डोईतले मोरपिस आणि त्याच्या हातातली मुरली ही त्याच्या सौंदर्यप्रेमाची आणि कलाप्रेमाची प्रतीके आहेच. मुरलीच्या मंजुळ स्वरातून त्याची सौंदर्यप्रीती अखंड निनादत राहिली आहे.

ज्ञानदेवांचा हृदयात या कृष्णाचे देहुडे रूप उभे आहे. त्याच्या मुरलीनादाने अवघे चराचर डोलू लागते, मग गोपी डोलल्या नाहीत तरच नवल! त्याच्या मुरलीतून कुणाला रती ऐकू येईल तर कुणाला विरती. त्याच्या स्वराने कुणाला मोह पडेल तर कुणाचा मोह दूर होईल. हे ज्याच्या त्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे. बाळाचा वाढदिवस साजरा करणार्‍या मायबापांनी मूल मोठे झाले म्हणून हरखून जावे की त्याच्या आयुष्यातली काही वर्षे विझून ते मृत्यूच्या अधिक जवळ गेले म्हणून हळहळत बसावे? हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. कृष्णरूप सर्वव्यापक आहे. एका अर्थाने ते मोहित करणारे आहे तर दुसर्‍या अर्थाने ते मोह दूर करणारे देखील आहे. कृष्णाने गोपींना मोहात पाडले आणि कृष्णानेच अर्जुनाच्या दृष्टीवर आलेले मोहपडळ हलक्या हाताने दूरही केले.

विश्‍व हे परब्रह्माचेच रूप आहे. म्हणून साकार-निराकार अशा समग्र परमात्म्यावर प्रेम करा असा वेणुनाद करीत ज्ञानदेवांचा कृष्ण कल्पवृक्षाखाली उभा आहे. सामान्य वृक्षाखाली तो उभा नाही. खरे तर स्वर्गातला कल्पवृक्ष काय देतो? सामान्य सुखाची साधने. शाश्‍वत परमात्मसुख तो काही देऊ शकत नाही. परंतु कृष्ण हा असा कल्पवृक्ष की जो असीम आणि अवीट असे परमात्मसुख भक्तांना देतो. ज्याला हे सुख प्राप्त होते त्याला सामान्य सुखाची, देहभोगाची कशाला मातब्बरी वाटेल? कमळदळाच्या ताटात जो चंद्रामृताचे भोजन करतो तो चकोर वाळवंटाचे चुंबन कशाला घेत बसेल? कृष्ण कल्पवृक्षाखाली उभा आहे याचा अर्थ तो भक्तांचे मनोरथ पूर्ण करायला सिद्ध आहे.

आपल्या भावविश्‍वात कृष्णरूप पाहताच ‘हाच तो गोविंद, हाच तो गोपाळ’ असा आनंदोद्गार ज्ञानदेवांचा मुखातून निघतो. कृष्णरूपात अंतर्बाह्य परमानंद भरून राहिलेला आहे. गूळ जसा अंतर्बाह्य मधुर असतो त्याप्रमाणे. तो कसाही, कोणीकडूनही खा. गोडच लागतो. तसे या परब्रह्माचे सगुण रूप आणि निर्गुण रूप निखळ आनंदच देते. अनिमिष नेत्रांनी त्याचे सगुण-साकार रूप न्याहाळावे तर हृदयात आनंदसागर उचंबळतो आणि डोळे मिटून त्याच्या निर्गुण-निराकार रूपाचे ध्यान करावे तरीही तशीच अवस्था होते.
विटेवर उभा असलेला विठ्ठल म्हणजे सावळा सगुण कृष्णच. हा सर्व जिवांचे जीवन आहे. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणार्‍या मानवप्राण्याचा श्‍वास हाच आहे आणि डोळ्यांना न दिसणार्‍या इवल्याइवल्या जीवांचे हृदयस्पंदनही हाच आहे. बालकाच्या निरागस चेहर्‍यावरचे निर्मळ हास्य आणि दुःखिताच्या चेहर्‍यावरची वेदना हाच विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणजे समग्र विश्‍वाची प्रेरणा. हातात आसूड घेणार्‍या नृशंसाच्या मस्तवालपणात आणि पाठीवर आसुडाचे फटके निमूटपणे सोसणार्‍या पीडिताच्या सहनशक्तीत त्याचीच प्रेरणा असते. विद्युत्प्रवाह एकच असतो. त्याच्यामुळे पंखा फिरतो आणि ट्युब प्रकाशित होते. पंख्याची रचना फिरण्यासारखी तर ट्युबची रचना प्रकाशित होण्यासारखी असते. ते त्यांचे गुणधर्म असतात, विद्युत्शक्तीचे नव्हेत. एकाच विद्युत्प्रवाहामुळे पंखा फिरतो आणि ट्युब प्रकाशित होते. त्याप्रमाणे विश्‍वातली प्रत्येक हालचाल परमात्म्याच्या प्रेरणेने होत असते. सुष्ट आणि दुष्ट, सत्कर्म आणि दुष्कर्म हे संदर्भ मानवी आहेत.

असा हा जगच्चालक परमात्मा कृष्ण ज्ञानदेवांना विठ्ठलाच्या मूर्तीत दिसतो. जिच्यात केवळ घनदाट आनंदच भरलेला आहे अशी त्याची आनंदघन मूर्ती पाहताच त्यांचे मन हरपून जाते. खरे तर भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये देह आणि मन हेच दोन पदर द्वैत राखत असतात. आकाश एकच असते, परंतु भिंती उभ्या केल्या की ते वेगळे भासू लागते. भिंती काढून टाकल्या तर ते एकच असते. ते वेगळे कधी झाले होते? असा प्रश्‍न पडतो. त्याप्रमाणे देह-मनाचे पदर भक्त-भगवंताच्या आड असतात. परंतु ते गळून पडण्याची मात्र आवश्यकता नसते. मन पूर्ण विठ्ठलमय झाले की मग आत्मा तर विठ्ठल असतोच, पण देहदेखील विठ्ठलमय होऊन जातो. तीर्थ, क्षेत्र सारे काही विठ्ठलमय होते. ज्या महात्म्यांचे देह-मन असे विठ्ठलमय, परब्रह्मरूप होऊन जातात त्यांचे मृतशरीर आणि समाधिस्थळदेखील पवित्र आणि पूजनीय ठरते.

विठ्ठलाची आनंदघन मूर्ती पाहता पाहता ज्ञानदेवांचे मन हरपून गेले. हरपून गेले म्हणजे विठ्ठलमय झाले. एखादी काच इतकी स्वच्छ आणि पारदर्शी असते की तिच्यातून पलीकडले दृश्य पाहताना ते काचेतून पाहतो आहोत हे जाणवतदेखील नाही. ज्ञानदेवांचे मन असेच पारदर्शी झाले आहे. मनाचे मनपणच सरले. मग मनातून आत पाहिले तरी विठ्ठल आणि मनातून बाहेर पाहिले तरी विठ्ठलच. असा अंतर्बाह्य अवघा परमानंद भरलेला. हा आनंदघन विठ्ठल सर्वव्यापक आहे. तो शून्य, स्थावर, जंगम या सर्वांना व्यापून राहिलेला आहे. शून्य म्हणजे आकाश. आकाश हे पंचमहाभूतांतील एक भूत, तत्त्व आहे. परंतु ते अभावरूप, अत्यंत सूक्ष्म आहे. ते आहे पण हाताला लागत नाही. नसणे हेच त्याचे रूप. म्हणून आकाश म्हणजे शून्य. विठ्ठल आकाशाला व्यापून आहे. स्थावर म्हणजे स्थिर. जंगम म्हणजे अस्थिर, पृथ्वी, पर्वत, वृक्ष हे स्थिर आहेत तर पशू, पक्षी, मानव हे अस्थिर म्हणजे एका ठिकाणी स्थिर न राहणारे आहेत. स्थावर-जंगम याचा अर्थ अचर आणि चर. चराचर. विठ्ठल सर्व चराचरांत व्यापलेला आहे. तो सर्व जगाला व्यापून आहे हे कोणालाही कळत नाही. म्हणून तो ‘अकळ’ होय. न कळणारा होय. त्याला समजून घेण्यासाठी ज्ञानदृष्टी लाभली पाहिजे.

ज्ञानदेवांचे बोलणे एका मूर्तीबद्दल नसून त्या मूर्तीतून अभिव्यक्त होणार्‍या तत्त्वाबद्दल आहे. मूर्ती विठ्ठलाची आहे, परंतु विठ्ठल सर्व विश्‍वांत व्यापून राहिलेला असा विश्‍वात्मक आहे. ज्ञानदेवांच्या दृष्टीत विठ्ठल म्हणजे परमात्मतत्त्व. कल्पद्रुमातळी वेणू वाजवणारा कृष्ण आणि विटेवर उभा असलेला विठ्ठल ही दोन्ही एकाच परब्रह्माची सगुण रूपे. म्हणूनच ज्ञानदेवांना वेणुनाद करीत कृष्ण साद घालतो आणि विटेवरच्या विठ्ठलात विलीन होतो. उत्तरेकडील कृष्णभक्तीच महाराष्ट्रात विठ्ठलभक्तीचे रूप घेऊन आली.
@ शे. दे. पसारकर
1997

Sunday, December 2, 2018

अमृताचा घनु

ज्ञानदेवांच्या अभंगाचे विवरण


३. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी


सत्य ज्ञानानंत गगनाचें प्रावर्ण ।
नाहीं रूप गुण वर्ण जेथें ॥१॥

तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी ।
पाहते पाहणें दुरी सारोनियां ॥२॥


ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती ।
ते हे उभी मूर्ति विटेवरी ॥३॥

भावार्थ
जो सत्यरूप आणि ज्ञानरूप असून गगनाचेही प्रावरण असलेला असा अनंत आहे; जेथे रूप नाही, गुण नाहीत, वर्ण नाही.(१) असा हा श्रीहरी पाहणारा आणि पाहणे असा भेद दूर सारून मी डोळे भरून पाहिला.(२) ज्ञानदेव म्हणतात, सर्व ज्योतींची ज्योत असलेली मूर्तीच येथे विटेवर उभी आहे.(३)

विवरण
श्रीविठ्ठलाचे सगुण-साकार रूप पाहता पाहता ज्ञानदेवांच्या अंतःचक्षूंपुढे त्याचे निर्गुण-निराकार रूप उभे राहते. सर्व भूतांत भगवंत पाहणारी ज्ञानदृष्टी लाभली की जिकडे तिकडे सर्वत्र तोच दिसू लागतो. निराकारात साकाराचे आणि साकारात निराकाराचे दर्शन होऊ लागते. समुद्रात लाटा आणि लाटांत समुद्र दिसू लागतो. आकार पाहण्यासाठी डोळ्यांना कष्ट पडत नाहीत. केवळ विटेवरला विठ्ठलच नव्हे, तर अवघे विश्‍वच आपल्या दृष्टिपुढे आकार घेऊन उभे असते. आकारात निराकार शोधणारी दृष्टी ज्ञानदृष्टी होय. विटेवरले सावळे रूप पाहता पाहता ज्ञानदेवांची दृष्टी रूप-गुण-वर्णांच्या पल्याड पोहोचते. पाहते-पाहणे हा भेद दूर सारून ज्ञानरूप, अनंत सत्याकडे डोळे भरून पाहते आणि पुन्हा ऐलतीरावर येऊन विटेवरल्या शिलामूर्तीत विश्‍वतेजाला तेज देणार्‍या ज्योतिर्मय रूपाचे दर्शन घेते. ज्ञानदेवांची दृष्टी, त्यांचे भावविश्‍व परतत्त्वाने कसे व्यापून टाकले होते, याचे या अभंगात दर्शन घडते.

श्रीहरी सत्यरूप, ज्ञानरूप आणि अनंत आहे. सत् म्हणजे अस्तित्व. ज्याला अस्तित्व असते ते सत्य. व्यवहारात खरे बोलणे यालाही ‘सत्य’ अशी संज्ञा आहे. ‘सत्य’ म्हणजे ‘सत्या’बद्दल बोलणे. आद्य शंकराचार्यांनी ‘ब्रह्म सत्यम्, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः’ अशी ब्रह्म, जगत् आणि जीव यांच्याविषयी त्रिसूत्री सांगितली आहे. ‘ब्रह्म सत्यम्’ म्हणजे केवळ ब्रह्मच अस्तित्वात आहे, दुसर्‍या कशालाही अस्तित्व नाही. श्रीहरी सत्यरूप आहे. या ‘सत्या’चीच सत्ता (सत्ता) अवघ्या ब्रह्मांडात भरून राहिली आहे. सागरावर लाटा उसळतात. त्या सागरापासून भिन्न भासल्या तरी सागराशी एकरूपच असतात. लाटांना कधी अस्तित्व असेल अथवा कधी नसेल देखील. परंतु सागराला मात्र अस्तित्व असतेच असते. म्हणून सागर ‘सत्य’ होय. ज्याचे अस्तित्व कशावरही अवलंबून नाही असे निरपेक्ष अस्तित्व असलेले तत्त्व म्हणजे सत्य. श्रीहरी सत्यरूप आहे म्हणजे त्याचे असणे दुसर्‍या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही. विश्‍वाच्या मुळाशी असलेले, समग्र विश्‍वाला व्यापून राहिलेले परतत्त्व हेच ‘सत्य’ होय.

श्रीहरी ज्ञानरूप आहे. जे सत्य असते ते ज्ञानरूप असते, स्वसंवेद्य असते. ज्ञान म्हणजे चित्. (‘सत्य ज्ञानानंत’ हा पाठ मुळात ‘सत्य ज्ञानानंद’ असा तर नसेल? सत्य-ज्ञान-आनंद म्हणजे सत्-चित्-आनंद. ‘सच्चिदानंद’ हे परब्रह्माचे स्वरूपलक्षण होय.) सत्जवळ अज्ञान संभवतच नाही. सूर्याजवळ अंधार कसा असेल? ‘सत्’ला स्व-रूपाचे ‘ज्ञान’ नसेल तर ते ‘जड’ ठरेल. सत्य ज्ञानरूप आहे आणि ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य देखील आहे. त्याचे ज्ञान हेच खरे ज्ञान, बाकी सारे शब्दज्ञान. शब्दज्ञान म्हणजे माहिती. ज्ञान आणि शब्दज्ञान यांत महदंतर असते. ‘ज्ञानाएवढे पवित्र जगात काही नाही’ असे जेव्हा गीता सांगते तेव्हा ती शालान्त परीक्षेत भरपूर गुण मिळवून देणार्‍या ‘ज्ञाना’बद्दल बोलत नसते. शाळा-कॉलेजात मिळणारे पुस्तकी ज्ञान म्हणजे केवळ शब्दज्ञान. त्यात अनुभूतीचा लवलेशही नसतो. वनस्पतींना प्राण असतो, त्यांना संवेदना असते हे ज्ञान वनस्पतिशास्त्राच्या पुस्तकातून मिळते. मग माणूस जेव्हा वृक्षाखाली उभा असतो तेव्हा त्याला आपल्या मागे चैतन्य उभे आहे, आपण चैतन्याच्या सावलीत उभे आहोत असे वाटत असते काय? त्याला तसे वाटले असते तर त्याने गंमत म्हणून वृक्षाची पाने चुरगळली असती? त्याच्या फांद्या निर्दयपणे कडाकड मोडून टाकल्या असत्या? आणि कोणाचे तरी नाव वृक्षाच्या अंगावर चाकूने अकारण कोरले असते? ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे तुकाराम गहिवरून बोलतात ते अनुभूतीच्या बळाने; वनस्पतिशास्त्र वाचून नव्हे. ज्ञान आणि शब्दज्ञान यांत एवढे अंतर आहे. म्हणून परतत्त्वाचे ज्ञान हे खरे ज्ञान. त्याचे ज्ञान झाल्यावर हृदय प्रकाशाने उजळून जाते आणि आत-बाहेर सर्वत्र प्रकाशच प्रकाश दिसू लागतो.

श्रीहरी अनंत आहे. जे निराकार असते ते अनंत असते, अमर्याद असते. आकार आला की मर्यादा पडली. ज्ञानदेवांनी ‘गगनाचे प्रावर्ण’ असे श्रीहरीचे वर्णन केले आहे. प्रावरण म्हणजे वस्त्र. तो आकाशाला झाकून टाकण्याइतका व्यापक, अनंत आहे. आकाश म्हणजे विराट पोकळी. आकाश हे आपल्या अनुभवविश्‍वातील सर्वव्यापी तत्त्व आहे. कधी ते क्षितिजावर टेकलेले दिसते. परंतु तो दृष्टिभ्रम असतो. पृथ्वीवरल्या पाच अब्ज माणसांची आयुष्ये स्वतःच्या आयुष्यात मिळवून जर कोणी आकाशाचा अंत शोधायला निघाला तर पाच अब्ज आयुष्ये संपून जातील; परंतु आकाशाचा अंत लागणार नाही. आकाश आपल्या अवतीभोवती सर्वत्र सूक्ष्मरूपाने पसरलेले असते. आपण घरात राहतो म्हणजे घराच्या पोकळीत, आकाशातच राहत असतो. चार भिंती उभ्या करून वर छप्पर घातले की आतले बंदिस्त आकाशच आपले घर होते. अशा सर्वव्यापी आकाशाचे प्रावरण असलेला श्रीहरी किती व्यापक असेल बरे? म्हणून आपल्याला अनंत भासणारे आकाश सान्त (मर्यादित) आहे. श्रीहरी मात्र अनंत आहे.
असा हा श्रीहरी. सत्यरूप, ज्ञानरूप आणि अनंत. मग तेथे चर्मचक्षूला दिसू शकणारे रूप, गुण, वर्ण कसे असतील? आपल्या अवतीभोवती व्यापलेल्या आकाशालाच रूप नाही तर आकाशाला व्यापणार्‍या श्रीहरीला कसे रूप असेल? परंतु या अरूपाला, निर्गुणाला, वर्णातीताला ज्ञानदेव डोळे भरून पाहतात. पण हे पाहणे कसे? तर पाहणारा आणि पाहणे हा भेद दूर सारून. एका दर्पणाने दुसर्‍या दर्पणात स्व-रूप पाहावे तसे. घागर पाण्याने पूर्ण भरून जलाशयात बुडाल्यावर कुणी कुणाकडे पाहायचे? घागरीतल्या जलाने बाहेरच्या जलाकडे? की बाहेरच्या जलाने घागरीतल्या जलाकडे? तेथे पाहणारा उरत नाही आणि पाहणेदेखील उरत नाही. ज्ञानदेवांचे ‘डोळे भरून पाहणे’ असे आहे.

श्रीहरीच्या निर्गुण-निराकार रूपात तल्लीन झालेल्या ज्ञानदेवांना भान येते तेव्हा विटेवरले सावळे परब्रह्म त्यांच्याकडे पाहात हसत उभे असते. सत्य-ज्ञानरूप श्रीहरी म्हणजे विश्‍वाचे जीवन. विश्‍वाचा प्रकाश. त्याच्या तेजानेच सूर्य-तार्‍यांना तेज लाभले आहे. त्याच्या प्रकाशाने विश्‍व उजळून गेले आहे, त्याच्या सुखानेच विश्‍व सुखी झाले आहे (यद्भासा भासते विश्‍वं यत्सुखेनानुमोदते). ज्योतीला तेज देणारी ज्योत म्हणजे विटेवर उभी असलेली विठ्ठलमूर्ती. सामान्यांच्या दृष्टीला जी मूर्ती शिळेची दिसते तिच्यात ज्ञानदेवांना तेज दिसते. विठ्ठलाच्या शिलामूर्तीत ते श्रीहरीच्या, परब्रह्माच्या तेजोमय रूपाचे दर्शन घेतात. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मतेजाने उजळून गेले आहे. सिद्धपुरुषाचे जेथे पाऊल पडते तेथे महासिद्धी हात जोडून उभ्या राहतात, त्याप्रमाणे ज्ञानदेवांची चैतन्यदृष्टी जेथे पडते तेथे प्रकाशाचा सागर उचंबळत राहतो. म्हणून रूप-गुण-वर्णापलीकडच्या सत्य-ज्ञानरूप श्रीहरीकडे, गगनाला गवसणी घालणार्‍या त्या अनंताकडे ते डोळे भरून पाहतात आणि रूप-वर्णापलीकडे स्थिर झालेली त्यांची दृष्टी जेव्हा विटेवरल्या सावळ्या रूपाकडे वळते तेव्हा तेथे त्यांना विश्‍व प्रकाशित करणार्‍या तेजाचा साक्षात्कार होतो.
@शे. दे. पसारकर
1997