Sunday, December 2, 2018

अमृताचा घनु

ज्ञानदेवांच्या अभंगाचे विवरण


३. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी


सत्य ज्ञानानंत गगनाचें प्रावर्ण ।
नाहीं रूप गुण वर्ण जेथें ॥१॥

तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी ।
पाहते पाहणें दुरी सारोनियां ॥२॥


ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती ।
ते हे उभी मूर्ति विटेवरी ॥३॥

भावार्थ
जो सत्यरूप आणि ज्ञानरूप असून गगनाचेही प्रावरण असलेला असा अनंत आहे; जेथे रूप नाही, गुण नाहीत, वर्ण नाही.(१) असा हा श्रीहरी पाहणारा आणि पाहणे असा भेद दूर सारून मी डोळे भरून पाहिला.(२) ज्ञानदेव म्हणतात, सर्व ज्योतींची ज्योत असलेली मूर्तीच येथे विटेवर उभी आहे.(३)

विवरण
श्रीविठ्ठलाचे सगुण-साकार रूप पाहता पाहता ज्ञानदेवांच्या अंतःचक्षूंपुढे त्याचे निर्गुण-निराकार रूप उभे राहते. सर्व भूतांत भगवंत पाहणारी ज्ञानदृष्टी लाभली की जिकडे तिकडे सर्वत्र तोच दिसू लागतो. निराकारात साकाराचे आणि साकारात निराकाराचे दर्शन होऊ लागते. समुद्रात लाटा आणि लाटांत समुद्र दिसू लागतो. आकार पाहण्यासाठी डोळ्यांना कष्ट पडत नाहीत. केवळ विटेवरला विठ्ठलच नव्हे, तर अवघे विश्‍वच आपल्या दृष्टिपुढे आकार घेऊन उभे असते. आकारात निराकार शोधणारी दृष्टी ज्ञानदृष्टी होय. विटेवरले सावळे रूप पाहता पाहता ज्ञानदेवांची दृष्टी रूप-गुण-वर्णांच्या पल्याड पोहोचते. पाहते-पाहणे हा भेद दूर सारून ज्ञानरूप, अनंत सत्याकडे डोळे भरून पाहते आणि पुन्हा ऐलतीरावर येऊन विटेवरल्या शिलामूर्तीत विश्‍वतेजाला तेज देणार्‍या ज्योतिर्मय रूपाचे दर्शन घेते. ज्ञानदेवांची दृष्टी, त्यांचे भावविश्‍व परतत्त्वाने कसे व्यापून टाकले होते, याचे या अभंगात दर्शन घडते.

श्रीहरी सत्यरूप, ज्ञानरूप आणि अनंत आहे. सत् म्हणजे अस्तित्व. ज्याला अस्तित्व असते ते सत्य. व्यवहारात खरे बोलणे यालाही ‘सत्य’ अशी संज्ञा आहे. ‘सत्य’ म्हणजे ‘सत्या’बद्दल बोलणे. आद्य शंकराचार्यांनी ‘ब्रह्म सत्यम्, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः’ अशी ब्रह्म, जगत् आणि जीव यांच्याविषयी त्रिसूत्री सांगितली आहे. ‘ब्रह्म सत्यम्’ म्हणजे केवळ ब्रह्मच अस्तित्वात आहे, दुसर्‍या कशालाही अस्तित्व नाही. श्रीहरी सत्यरूप आहे. या ‘सत्या’चीच सत्ता (सत्ता) अवघ्या ब्रह्मांडात भरून राहिली आहे. सागरावर लाटा उसळतात. त्या सागरापासून भिन्न भासल्या तरी सागराशी एकरूपच असतात. लाटांना कधी अस्तित्व असेल अथवा कधी नसेल देखील. परंतु सागराला मात्र अस्तित्व असतेच असते. म्हणून सागर ‘सत्य’ होय. ज्याचे अस्तित्व कशावरही अवलंबून नाही असे निरपेक्ष अस्तित्व असलेले तत्त्व म्हणजे सत्य. श्रीहरी सत्यरूप आहे म्हणजे त्याचे असणे दुसर्‍या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही. विश्‍वाच्या मुळाशी असलेले, समग्र विश्‍वाला व्यापून राहिलेले परतत्त्व हेच ‘सत्य’ होय.

श्रीहरी ज्ञानरूप आहे. जे सत्य असते ते ज्ञानरूप असते, स्वसंवेद्य असते. ज्ञान म्हणजे चित्. (‘सत्य ज्ञानानंत’ हा पाठ मुळात ‘सत्य ज्ञानानंद’ असा तर नसेल? सत्य-ज्ञान-आनंद म्हणजे सत्-चित्-आनंद. ‘सच्चिदानंद’ हे परब्रह्माचे स्वरूपलक्षण होय.) सत्जवळ अज्ञान संभवतच नाही. सूर्याजवळ अंधार कसा असेल? ‘सत्’ला स्व-रूपाचे ‘ज्ञान’ नसेल तर ते ‘जड’ ठरेल. सत्य ज्ञानरूप आहे आणि ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य देखील आहे. त्याचे ज्ञान हेच खरे ज्ञान, बाकी सारे शब्दज्ञान. शब्दज्ञान म्हणजे माहिती. ज्ञान आणि शब्दज्ञान यांत महदंतर असते. ‘ज्ञानाएवढे पवित्र जगात काही नाही’ असे जेव्हा गीता सांगते तेव्हा ती शालान्त परीक्षेत भरपूर गुण मिळवून देणार्‍या ‘ज्ञाना’बद्दल बोलत नसते. शाळा-कॉलेजात मिळणारे पुस्तकी ज्ञान म्हणजे केवळ शब्दज्ञान. त्यात अनुभूतीचा लवलेशही नसतो. वनस्पतींना प्राण असतो, त्यांना संवेदना असते हे ज्ञान वनस्पतिशास्त्राच्या पुस्तकातून मिळते. मग माणूस जेव्हा वृक्षाखाली उभा असतो तेव्हा त्याला आपल्या मागे चैतन्य उभे आहे, आपण चैतन्याच्या सावलीत उभे आहोत असे वाटत असते काय? त्याला तसे वाटले असते तर त्याने गंमत म्हणून वृक्षाची पाने चुरगळली असती? त्याच्या फांद्या निर्दयपणे कडाकड मोडून टाकल्या असत्या? आणि कोणाचे तरी नाव वृक्षाच्या अंगावर चाकूने अकारण कोरले असते? ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे तुकाराम गहिवरून बोलतात ते अनुभूतीच्या बळाने; वनस्पतिशास्त्र वाचून नव्हे. ज्ञान आणि शब्दज्ञान यांत एवढे अंतर आहे. म्हणून परतत्त्वाचे ज्ञान हे खरे ज्ञान. त्याचे ज्ञान झाल्यावर हृदय प्रकाशाने उजळून जाते आणि आत-बाहेर सर्वत्र प्रकाशच प्रकाश दिसू लागतो.

श्रीहरी अनंत आहे. जे निराकार असते ते अनंत असते, अमर्याद असते. आकार आला की मर्यादा पडली. ज्ञानदेवांनी ‘गगनाचे प्रावर्ण’ असे श्रीहरीचे वर्णन केले आहे. प्रावरण म्हणजे वस्त्र. तो आकाशाला झाकून टाकण्याइतका व्यापक, अनंत आहे. आकाश म्हणजे विराट पोकळी. आकाश हे आपल्या अनुभवविश्‍वातील सर्वव्यापी तत्त्व आहे. कधी ते क्षितिजावर टेकलेले दिसते. परंतु तो दृष्टिभ्रम असतो. पृथ्वीवरल्या पाच अब्ज माणसांची आयुष्ये स्वतःच्या आयुष्यात मिळवून जर कोणी आकाशाचा अंत शोधायला निघाला तर पाच अब्ज आयुष्ये संपून जातील; परंतु आकाशाचा अंत लागणार नाही. आकाश आपल्या अवतीभोवती सर्वत्र सूक्ष्मरूपाने पसरलेले असते. आपण घरात राहतो म्हणजे घराच्या पोकळीत, आकाशातच राहत असतो. चार भिंती उभ्या करून वर छप्पर घातले की आतले बंदिस्त आकाशच आपले घर होते. अशा सर्वव्यापी आकाशाचे प्रावरण असलेला श्रीहरी किती व्यापक असेल बरे? म्हणून आपल्याला अनंत भासणारे आकाश सान्त (मर्यादित) आहे. श्रीहरी मात्र अनंत आहे.
असा हा श्रीहरी. सत्यरूप, ज्ञानरूप आणि अनंत. मग तेथे चर्मचक्षूला दिसू शकणारे रूप, गुण, वर्ण कसे असतील? आपल्या अवतीभोवती व्यापलेल्या आकाशालाच रूप नाही तर आकाशाला व्यापणार्‍या श्रीहरीला कसे रूप असेल? परंतु या अरूपाला, निर्गुणाला, वर्णातीताला ज्ञानदेव डोळे भरून पाहतात. पण हे पाहणे कसे? तर पाहणारा आणि पाहणे हा भेद दूर सारून. एका दर्पणाने दुसर्‍या दर्पणात स्व-रूप पाहावे तसे. घागर पाण्याने पूर्ण भरून जलाशयात बुडाल्यावर कुणी कुणाकडे पाहायचे? घागरीतल्या जलाने बाहेरच्या जलाकडे? की बाहेरच्या जलाने घागरीतल्या जलाकडे? तेथे पाहणारा उरत नाही आणि पाहणेदेखील उरत नाही. ज्ञानदेवांचे ‘डोळे भरून पाहणे’ असे आहे.

श्रीहरीच्या निर्गुण-निराकार रूपात तल्लीन झालेल्या ज्ञानदेवांना भान येते तेव्हा विटेवरले सावळे परब्रह्म त्यांच्याकडे पाहात हसत उभे असते. सत्य-ज्ञानरूप श्रीहरी म्हणजे विश्‍वाचे जीवन. विश्‍वाचा प्रकाश. त्याच्या तेजानेच सूर्य-तार्‍यांना तेज लाभले आहे. त्याच्या प्रकाशाने विश्‍व उजळून गेले आहे, त्याच्या सुखानेच विश्‍व सुखी झाले आहे (यद्भासा भासते विश्‍वं यत्सुखेनानुमोदते). ज्योतीला तेज देणारी ज्योत म्हणजे विटेवर उभी असलेली विठ्ठलमूर्ती. सामान्यांच्या दृष्टीला जी मूर्ती शिळेची दिसते तिच्यात ज्ञानदेवांना तेज दिसते. विठ्ठलाच्या शिलामूर्तीत ते श्रीहरीच्या, परब्रह्माच्या तेजोमय रूपाचे दर्शन घेतात. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मतेजाने उजळून गेले आहे. सिद्धपुरुषाचे जेथे पाऊल पडते तेथे महासिद्धी हात जोडून उभ्या राहतात, त्याप्रमाणे ज्ञानदेवांची चैतन्यदृष्टी जेथे पडते तेथे प्रकाशाचा सागर उचंबळत राहतो. म्हणून रूप-गुण-वर्णापलीकडच्या सत्य-ज्ञानरूप श्रीहरीकडे, गगनाला गवसणी घालणार्‍या त्या अनंताकडे ते डोळे भरून पाहतात आणि रूप-वर्णापलीकडे स्थिर झालेली त्यांची दृष्टी जेव्हा विटेवरल्या सावळ्या रूपाकडे वळते तेव्हा तेथे त्यांना विश्‍व प्रकाशित करणार्‍या तेजाचा साक्षात्कार होतो.
@शे. दे. पसारकर
1997

No comments:

Post a Comment