अमृताचा घनु
ज्ञानदेवांच्या अभंगांचे विवरण
२. उभा भीवरेच्या तटी । देखिला देवो
अनुपम्य मनोहर । कांसे शोभे पितांबर ।
चरणीं ब्रीदाचा तोडर । देखिला देवो ॥१॥
योगियांची कसवटी । दावितसे नेत्रपुटीं ।
उभा भीवरेच्या तटीं । देखिला देवो ॥२॥
बाप रखुमादेविवरु । पुंडलिका अभयकरु ।
परब्रह्म साहाकारु । देखिला देवो ॥३॥
भावार्थ
ज्याला दुसरी उपमा नाही, जो भक्तांच्या मनाचे हरण करणारा आहे असा देव मी पाहिला. त्याच्या कमरेला पितांबर शोभत असून पायात भक्तरक्षणाचा तोडा आहे.(१) याच्या डोळ्यांची स्थिती पाहता या योग्यांची कसोटी आहे असे दिसते. असा देव भिवरेच्या तीरावर उभा असलेला मी पाहिला.(२) हा बाप, रखुमादेवीचा पती श्रीविठ्ठल भक्त पुंडलिकाला अभय देणारा आहे. भक्तांना साहाय्य करणारे परब्रह्मच मी या देवाच्या रूपाने पाहिले.(३)
विवरण
श्रीविठ्ठलाचे दर्शन कोणकोणत्या रूपांत झाले याचे वर्णन या अभंगात ज्ञानदेवांनी केले आहे. अभंगाची तीन कडवी म्हणजे ज्ञानदेवांना दिसलेली, भावलेली विठ्ठलाची तीन रूपे, तीन दर्शने होत. पहिल्या कडव्यात कासेला पितांबर कसलेला, अनुपम, मनोहर, पायात भक्तरक्षणाचा तोडा घातलेला भक्तवत्सल विठ्ठल दिसतो. दुसर्या कडव्यात डोळ्यांची स्थिती दाखवून योगिजनांची कसोटी पाहणार्या विठ्ठलाचे दर्शन घडते तर तिसर्या कडव्यात पुंडलिकाला अभय देणारे परब्रह्म आपल्या दृष्टिसमोर उभे राहते. विठ्ठलाचे बाह्य रूप, डोळ्यांच्या स्थितीवरून त्याची अंतरंग-अवस्था आणि त्याचे परब्रह्मत्व अशी तीन रूपे ज्ञानदेवांनी आपल्या पुढे उभी केली आहेत. हे विठ्ठलाचे ‘दिसणे’ आहे आणि ज्ञानदेवांचे ‘पाहणे’ देखील आहे. सामान्य दृष्टीला विठ्ठलाची अशी दर्शने घडतीलच असे सांगता यायचे नाही. अधिक विचार केला तर असेही वाटते की एका अर्थाने हे विठ्ठलाकडे पाहणे आहे तर दुसर्या अर्थाने स्वतःच्या अंतरंगात डोकावणे देखील आहे. विठ्ठलाचे साकार रूप पाहता पाहता योग्यासारखी दृष्टी अंतर्मुख होऊन हृदयात उभ्या असलेल्या परब्रह्मस्वरूप विठ्ठलाचे दर्शन व्हावे आणि दृष्टी पुन्हा बाहेर वळल्यावर जिकडे तिकडे विठ्ठलच दिसावा, अशा अंतरंगस्थितीचे वर्णन तर ज्ञानदेव करीत नाहीत ना! बाह्य दर्शनाने आत जाग यावी आणि आतल्या जागृतीने बाहेरील जडात देखील चैतन्य दिसू लागावे अशी ही अवस्था आहे.
विठ्ठलाच्या रूपाबद्दल अनुपम्य आणि मनोहर ही दोन विशेषणे ज्ञानदेवांनी योजिली आहेत. ज्याला दुसरी कोणतीही उपमा देता येत नाही ते अनुपम्य होय. ईश्वरी सौंदर्याला कशाची उपमा देता येईल बरे! विठ्ठलाची मूर्ती शिलानिर्मित असेल परंतु तिच्यात ज्ञानदेव चैतन्य पाहात आहेत. प्रारंभावस्थेत साधकाला, भक्ताला चेतन आणि जड अशी विभागणी करून आत्मानात्मविवेक सांगावा लागतो. देह जड आहे- आत्मा चेतन आहे, विश्व जड आहे- परमात्मा चेतन आहे, याप्रकारे. परंतु साक्षात्कारानंतर जड आणि चेतन असा भेद उरत नाही. जे काही आहे ते सारे भगवद्रूप दिसू लागते. जडातदेखील गूढरूपाने चैतन्य वसत असते (अत्यन्तगूढचैतन्यं जडमव्यक्तमुच्यते). सामान्य दृष्टीला ते जाणवत नाही इतकेच. योगिराज ज्ञानदेवांना मात्र संपूर्ण विश्व म्हणजे अनावृत्त परतत्त्वच आहे असा साक्षात्कार झालेला आहे. ‘चांगदेवपासष्टी’त त्यांनी म्हटले आहे,
कल्लोळ कंचुक । न फेडिता उघडे उदक ।
तेवी जगेसी सम्यक । स्वरूप जो ॥
पाण्याने तरंगांची कांचोळी फेडली नाही तरी ते पाणीच असते. म्हणजे पाण्यावर तरंग उठलेले असले तरी तरंग म्हणजे पाणीच आहे हे भान आपल्याला असते. त्याप्रमाणे हे जग सामान्य दृष्टीला जड भासत असले तरी ते वस्तुतः परतत्त्वावरील तरंग आहे, परब्रह्मरूप आहे. या विश्वातून परतत्त्वच अभिव्यक्त होत आहे. ज्ञानदेवांच्या अशा ज्ञानदृष्टीला विठ्ठलाच्या शिलामूर्तीत चैतन्याचे सौंदर्य दिसणार नाही तर काय! समग्र विश्वसौंदर्य ज्यात एकवटलेले आहे त्या विठ्ठलाला कशाची उपमा देणार! म्हणून तो अनुपमेय आहे. तो मनाचे हरण करणारा आणि मनाला सुखविणारा असा मनोहर आहे.
सामान्य माणसाला सांसारिक वस्तू आणि सुखोपभोग मनोहर वाटत असतात. ते काही काळ मनोहर भासतातही, परंतु पुढे हळूहळू विटत जातात. ऊस बुडाकडून शेंड्याकडे खात गेल्यावर त्याची गोडी उणावत जाते, तसे. प्रारंभी मनोहर भासणार्या सांसारिक वस्तू, व्यक्ती पुढे चिंता उत्पन्न करतात. परंतु हा मनोहर विठ्ठल मात्र चिंता नव्हे तर चिंतन करायला लावतो. याच्या मनोहर रूपामुळे हा भक्तांचा चिंतनविषय होतो. याच्या कमरेला पितांबर शोभत आहे. त्या वस्त्राचा पिवळा रंग पक्वतेचा निदर्शक आहे. परब्रह्माएवढे परिपक्व, परिपूर्ण दुसरे काय आहे? याच्या पायात तोडा आहे. हा तोडा म्हणजे भक्तरक्षणाचे ब्रीद. व्रतपालनाचा निश्चय केल्यावर त्याचे एखादे चिन्ह अंगावर धारण केले जाते. वारकर्याच्या गळ्यातली तुळशीमाळ, विवाहितेच्या गळ्यातले मंगळसूत्र ही व्रतपालनाची प्रतीकेच आहेत. जो गळ्यात तुळशीमाळ घालतो त्याच्या जीवनाची दिशाच बदलून जाते. त्याला पुढील आयुष्य यम-नियमांनी संयमित करावे लागते. जिभेवर शिव्यांऐवजी ओव्यांची आणि हरिनामाची स्थापना करावी लागते. गळ्यातली माळ सदाचरणाची सदैव आठवण देत असते. सांसारिक जीवनाचा आरंभ करणार्या विवाहितेला गळ्यातले मंगळसूत्र वैवाहिक निष्ठेची जाणीव करून देत असते. त्याप्रमाणे विठ्ठलाच्या पायातील तोडा जणू त्याला भक्तरक्षणाची आठवण करून देत आहे. किंबहुना, हे स्मरण सदैव असावे म्हणूनच त्याने तो पायात धारण केला आहे.
आपले टपोरे डोळे मिटून हा विठ्ठल योगिजनांची कसोटी पाहत भिवरेच्या तीरावर उभा आहे. डोळे मिटणे ही योगशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण क्रिया आहे. रोग्याचे डोळे ग्लानीमुळे मिटतात तर भोग्याचे डोळे निद्रेमुळे मिटतात. योग्याचे डोळे मिटणे ही ग्लानी नव्हे आणि निद्राही नव्हे. त्याचे डोळे मिटणे हे एक प्रकारचे जागेपण आहे. बाह्यतः त्याचे डोळे मिटलेले दिसतात, परंतु आत मात्र पूर्ण जागृती असते. डोळे मिटून कसे जागे राहावे याचा वस्तुपाठच योगिजनांना देत विठ्ठल उभा आहे. बाहेर निद्रेची पाखर पडलेली आणि आत मात्र मन कमळासारखे पूर्ण उमललेले, सजग. अशी अवस्था तुम्हाला साधली काय, असे जणू तो योग्यांना विचारीत त्यांची कसोटी पाहतो आहे. विठ्ठलाचे मिटलेले डोळे ही योगदृष्टी होय, हे रहस्य ज्ञानदेवांनी जाणले आहे.
योग्यांची कसोटी पाहणारा हा विठ्ठल भक्त पुंडलिकाला अभय देणारा, भक्तांना साह्य करणारा असा कृपाळूदेखील आहे. ‘साहाकारु’ या ठिकाणी ‘साकारु’ असाही एक पाठ आहे. या देवाच्या रूपाने परब्रह्म साकार झालेले मी पाहिले, असा त्याचा अर्थ लावता येतो. विठ्ठलाच्या साकार रूपात ज्ञानदेव निराकार असे परब्रह्म पाहात आहेत. कासेला पितांबर कसून, पायी तोडा घालून प्रत्यक्ष परब्रह्म भिवरेच्या तटी उभे आहे, हे ज्ञानदेवांनी या अभंगात सांगितले आहे.
@शे. दे. पसारकर
