Tuesday, November 20, 2018

ज्ञानदेवांच्या अभंगांचे विवरण


१. रूप पाहातां लोचनीं


रूप पाहातां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥

तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥

बहुता सुकृताची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥

सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेविवर ॥४॥


भावार्थ

सखे, ज्याचे रूप डोळ्यांनी पाहताच मला अपार सुख झाले तो हा विठ्ठल किती चांगला आहे!(१) हा माधव किती चांगला आहे बरे!(२) या विठ्ठलाविषयी आवड निर्माण होण्यासाठी फार मोठे पुण्य गाठीशी बांधावे लागते.(३) हा आपला बाप, रखुमादेवीचा पती श्रीविठ्ठल सर्व सुखांचे आगर आहे.(४)


विवरण

श्रीज्ञानदेवांच्या या अभंगात, श्रीविठ्ठलाचे सगुण-साकार रूप पाहिल्यावर हृदयात उचंबळणार्‍या आनंदोर्मीचे वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाचे रूप, त्यामुळे झालेले सुख, त्याचे बरवेपण, त्याच्या प्राप्तीसाठी जोडावी लागणारी पुण्याई यांचा उल्लेख करून शेवटी विठ्ठल सर्व सुखांचा साठा आहे असा काढलेला निष्कर्ष, असे या अभंगाचे स्वरूप आहे. महाराष्ट्रातील भजनसोहळ्याचा प्रारंभ याच अभंगाने होत असतो.


ज्ञानदेवांची बुद्धी हीच जणू त्यांची सखी आहे. ते तिच्याशी संवाद करतात. स्वतः भोगलेले सुख स्वतःलाच सांगावे अशी ही अवस्था आहे. साक्षात्कारात दुजेपण उरत नाही. परंतु बोलण्यासाठी दुसरा कोणीतरी हवा असतो. अशावेळी आपल्याला आपल्याशीच संवाद करावा लागतो. ज्ञानदेवांच्या अभंगात उपस्थित असलेली सखी म्हणजे त्यांची बुद्धी अर्थात् ते स्वतःच. बोलणे आणि ऐकणे या दोन्ही भूमिका ते स्वतःच करीत असतात.


हा विश्‍वप्रपंच नानाविध रूपरंगांनी नटलेला आहे. डोळ्यांना सुखविणारी सुरूपे या जगात पुष्कळ आहेत. झुळझुळ वाहणारे निर्झर, स्वच्छंद गाणारे पक्षी, हिरवी नवलाई पांघरलेल्या वृक्षवेली, निरागस गोंडस बालके आणि सौंदर्याचा मद वाटणार्‍या लावण्यवती स्त्रिया. एखादे गोंडस मूल, एखादी लावण्यवती पाहिल्यावर डोळ्यांना प्रारंभी सुख होईल, पण हे सुख अल्पकाळ टिकणारे असते.


मानवी सौंदर्य हे त्वचेएवढेच खोल असते. ते चिरस्थायी नसते. शरीरावरची त्वचा सोलून पाहिली तर मनुष्य किती सुंदर दिसेल? म्हणून तेच खरे सौंदर्य, जे ढळत नाही. तेच खरे रूप की जे पाहताना डोळे थकत नाहीत. विश्‍वातले समग्र रूपसौंदर्य एका ठिकाणी एकवटलेले आहे. परब्रह्माच्या सगुण-साकार रूपाच्या ठिकाणी. विटेवर उभ्या असलेल्या त्या सावळ्या सुंदराजवळ. हे रूप चर्मचक्षूंनी पाहायचे असते आणि अंतःचक्षूंनीही न्याहाळायचे असते. हे रूप पाहताना अंतरंगात कसा आनंदसागर उचंबळतो ते सांगण्यापलीकडचे आहे. हे रूप दिसायला साकार आहे, परंतु त्याला देहाचे विकार नाहीत, देह मातेच्या गर्भात उत्पन्न होतो, मग जन्मतो, वाढतो, बदलत जातो, क्षीण होतो आणि शेवटी मरतो. तो अस्तित्वात येतो आणि अस्तित्वशून्य होतो. म्हणून देहावर प्रेम करण्यापेक्षा परमेश्‍वराच्या साकार रूपावर प्रेम करणे केव्हाही श्रेयस्कर होय.


श्रीविठ्ठलाचे रूप पाहाताना होणारे सुखही मोठे विलक्षण. त्या सुखाची सामान्य सुखाशी तुलनाच करता येत नाही. शरीराच्या तारा छेडल्यावर प्राप्त होणारे हे शारीर सुख नव्हे आणि मनासारखे घडल्यावर लाभणारे हे मानसिक समाधानही नव्हे. ते सावळे रूप पाहता पाहता पापण्या अलगद मिटतात आणि मनबुद्धीच्या पल्याड असलेल्या सत्-चित्-आनंदसागराला हलकेच स्पर्श झाल्यावर जे आत जागे होते ते हे सुख होय. बाह्य दर्शनाने अंतरंगात उचंबळणारे हे विलक्षण सुख. म्हणून हे सुख ज्याच्या दर्शनाने प्राप्त होते त्या विठ्ठलाला सर्वेंद्रियांनी भजावे, सर्वभावाने आळवावे.


विठ्ठलाविषयी उत्कट भक्तिप्रेम मनात सहज जागे होत नाही. सामान्य माणसाचे सारे आयुष्य वितीएवढ्या पोटासाठी खर्ची पडते, त्या पलीकडे विचार करायला त्याला वेळच मिळत नाही. कधीही न भरणारे पोट आणि कधीच तृप्त न होणारे मन यांनी माणसाला कायमची गुलामी करायला भाग पाडले आहे. दोन वेळच्या भाकरीची सोय झाली की माणसाचे मन ‘हे हवे, ते हवे’ असे काही ना काही मागू लागते. मनुष्य आधी पोटाच्या मागे पळतो मग मनाच्या मागे. या धकाधकीत विठ्ठलाची आठवण कशी होणार? म्हणून ज्यांना विठ्ठलाची अनावर ओढ लागते त्यांनी जन्मजन्मांतरात खूप पुण्य साठवलेले असले पाहिजे. ‘बहुता सुकृताची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी’ हेच खरे. विठ्ठल ज्यांचे सर्वस्व आहे अशा भाग्यवंतांच्या पुण्याईबद्दल काय बोलावे! थोडासा पैसा खिशात खुळखुळू लागला की माणूस उताणा चालू लागतो. नशिबाने एखादे उच्च पद लाभले तर स्वतःच्या भाग्याचा हेवा करीत इतरांना क्षुद्र लेखू लागतो. देह म्हणजे आपण आणि देहाशी संबंधित तेवढेच आपले अशा क्षुद्र विचारात गुरफटलेल्या जिवाणूंना ‘विठ्ठलाची आवड’ कळायची नाही. सांसारिक सुखे थोड्या पुण्याईने मिळतात, परंतु जो सर्वसुखाचे आगर आहे अशा विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी मात्र अनंत जन्मांचे पुण्य वेचावे लागते. अशा भाग्यवंतांचा भाग्यानेच हेवा करायचा असतो. म्हणूनच ज्ञानदेवांनी विठ्ठलाविषयी आवड उत्पन्न झाल्याबद्दल या अभंगात धन्यता व्यक्त केली आहे.

@ शे. दे. पसारकर

No comments:

Post a Comment