Thursday, January 3, 2019

ज्ञानदेवांच्या अभंगाचे विवरण 

५. सगुण निर्गुण एकु गोविंदु रे



तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।
सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥
अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति नेति नेति म्हणती एकु गोविंदु रे ॥२॥
तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूळ सूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥
तुज आकारु म्हणों की निराकारु रे ।
आकारु निराकारु एकु गोविंदु रे ॥४॥
तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे ।
दृश्य अदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥
तुज व्यक्त म्हणों कीं अव्यक्तु रे ।
व्यक्त अव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥
निवृत्तिप्रसादें ज्ञानदेव बोले ।
बाप रखुमादेविवरु विठ्ठलु रे ॥७॥
भावार्थ
श्रीहरी, तुला सगुण म्हणावे की निर्गुण रे? विचार केल्यावर जाणवते की, सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपांत तूच एक गोविंद आहेस.(१) तू अनुमानाचा विषय नाहीस, अनुमान करून तुला जाणता येत नाही. वेदांनीसुद्धा ‘न इति, न इति’ असे म्हणत एका गोविंदाकडेच निर्देश केला आहे.(२) तुला स्थूल मानावे की सूक्ष्म रे? स्थूल-सूक्ष्म या दोन्हींत तूच एक गोविंद आहेस.(३) तुला साकार म्हणू की निराकार? साकार-निराकार दोन्ही रूपांत तूच एक गोविंद आहेस.(४) तुला दिसणारा मानू की न दिसणारा? परंतु दिसणार्‍या (दृश्य) आणि न दिसणार्‍या (अदृश्य) या दोन्ही रूपांतील गोविंद तूच एक आहेस.(५) तुला व्यक्त म्हणावे की अव्यक्त रे? व्यक्त-अव्यक्त रूपांत तूच एक गोविंद व्याप्त आहेस.(६) श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने ज्ञानदेव सांगतात- हा बाप, रखुमादेवीचा पती श्रीविठ्ठल सर्वत्र व्याप्त आहे.(७)

विवरण
ज्ञानदेव या अभंगात जणू परमात्म्याशी बोलत आहेत, संवाद करीत आहेत. एका अंगाने हा परमात्म्याशी संवाद आहे तर दुसर्‍या अंगाने हा स्वतःशी संवाद आहे. एखादे गीत जुळवल्यावर ते ओठातल्या ओठात गुणगुणत राहावे, तसे ज्ञानदेव जणू स्वतःशी बोलत आहेत. ते स्वतःच प्रश्‍न उपस्थित करतात आणि त्याचे उत्तरही स्वतःच देतात. सगुणात निर्गुणाचा, स्थूलात सूक्ष्माचा, साकारात निराकाराचा, दृश्यात अदृश्याचा आणि व्यक्तात अव्यक्ताचा घेतलेला हा शोध आहे. सगुण आणि निर्गुण मिळून परमात्म्याचे रूप परिपूर्ण होते, अशी ज्ञानदेवांना प्रचीती आली आहे. श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने आलेला हा एकत्वाचा अनुभव ज्ञानदेव या अभंगात कथन करतात. नाथपंथातली निर्गुणोपासना आणि विठ्ठलपंथातली सगुणोपासना यांचा मनोज्ञ संगम या अभंगात झालेला आहे.

ज्ञानदेव नाथसंप्रदायाचे दीक्षित आहेत. काश्मीरी शैवाद्वैतातील विचारधन परंपरेने त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे. वेदान्त तत्त्वज्ञानात जग हा परब्रह्मावरील विवर्त आहे, असे मानले जाते. विवर्त म्हणजे आभास. अंधारात दोरी सापासारखी भासते, पण ती साप नसते. साप हा दोरीवरील विवर्त (आभास) होय. त्याप्रमाणे हे जग परब्रह्मावरील विवर्त आहे. म्हणजे हे जग मुळात परब्रह्मच आहे, परंतु त्याचे आपण पाहतो ते रूप खरे नसून मिथ्या आहे. शंकराचार्यांनी ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ या श्‍लोकात हेच सांगितले आहे. ज्ञानदेवांना मात्र जग मिथ्या आहे हे मान्य नाही. जग हा तर परतत्त्वाचा विलास आहे, क्रीडा आहे. अलंकार सुवर्णापासून निर्माण होतात, परंतु त्याचे सोनेपण भंगत नाही. अलंकार करण्यापूर्वी ते जसे सोने असते तसेच अलंकारात परिवर्तित झाल्यावरही असते. अलंकार हा सोन्यावरील आभास (विवर्त) नव्हे, तर ते सोन्याचेच अधिक सुघटित देखणे रूप आहे. त्याप्रमाणे दृश्य जग हे परब्रह्माचेच रूप आहे, ते मिथ्या नाही; असे ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान आहे. त्यांचा अनुभवदेखील तसाच आहे.

ज्ञानदेव जेव्हा विश्‍वाकडे पाहतात तेव्हा त्यांना विश्‍वातून परब्रह्मच अभिव्यक्त होताना दिसते. परमात्मा विश्‍वरूप आहे, विश्‍व हे त्याचेच रूप आहे. परमात्मा जसा सत्य, शिव आणि सुंदर आहे तसेच हे विश्‍वदेखील सत्य, शिव, सुंदर आहे. जग हे मुळात पवित्र आणि सुंदर आहे. ते कधी अपवित्र आणि असुंदर दिसत असेल तर ती माणूसप्राण्याची करणी होय असे समजावे. दारिद्र्य आणि विषमता काही सुंदर नाही. पण ती ईश्‍वरनिर्मित, निसर्गनिर्मित नाही. जेव्हा एक मनुष्य अधाशीपणे आपल्या ताटात अधिक वाढून-ओढून घेतो तेव्हा तो दुसर्‍याला उपाशी ठेवत असतो. जेव्हा एखाद्या कपाटात हौसेखातर वस्त्रांचे ढिगारे जमलेले असतात तेव्हा दुसरीकडे कुणी मायबहीण विरलेल्या वस्त्रांतून आपली लाज कशीबशी झाकत असते. एका बाजूला जेव्हा गगनचुंबी इमारती उभ्या राहत असतात त्याचवेळी दुसर्‍या बाजूला हळूहळू झोपडवसाहतींची वाढ होत असते. परमात्म्याची प्रकृती (निसर्ग) संतुलन राखत असते, परंतु उपाशी मनाची माणसे मात्र आहे त्यात समाधान न मानता असंतुलन करीत असतात.

मानवनिर्मित दारिद्र्याची आणि विषमतेची झळ ज्ञानदेवासारख्या योगिराजालाही लागली. परंतु त्याबद्दल कुठेही त्यांनी शब्द उच्चारला नाही. आत्मरंगी रंगलेल्या त्या महात्म्याच्या लेखी या सामान्य गोष्टींना काय महत्त्व होते! ते तर श्रीविठ्ठलाचे सगुण-निर्गुण रूप न्याहाळण्यात तन्मय झालेले होते. त्या निराकाराची विश्‍वातली समग्र साकार रूपे पाहून अंतर्यामी हेलावत होते आणि त्या विश्‍वरूपालाच ‘तुला सगुण म्हणो की निर्गुण रे’ असा प्रश्‍न विचारत होते.

खरेच तो सगुण आहे की निर्गुण? सगुण-निर्गुण हे शब्द आपल्या कानांवर नित्य पडत असतात. परंतु त्यांचा अर्थ आपल्याला माहीत असतोच असे नाही. सांख्य तत्त्वज्ञानाने सत्त्व, रज आणि तम असे तीन गुण मानलेले आहेत. सांख्यांनी संपूर्ण विश्‍वाची पुरुष आणि प्रकृती अशी विभागणी केली आहे. पुरुष म्हणजे आत्मा, चेतनतत्त्व. प्रकृती म्हणजे सर्व दृश्य विश्‍व, जडतत्त्व. प्रकृती त्रिगुणात्मक असते म्हणजे सत्त्व, रज, तम या गुणांनी युक्त असते. विश्‍वातल्या प्रत्येक वस्तूत हे गुण असतात. परंतु आत्मा मात्र या गुणांच्या पलीकडे असतो, गुणातीत असतो, निर्गुण असतो. थोडक्यात सांगायचे तर दृश्य विश्‍व हे सगुण आहे, तर विश्‍वापलीकडले परतत्त्व निर्गुण आहे.

‘गुण’ या शब्दाचे आणखी एक स्पष्टीकरण देता येते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय आहेत. तसेच ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या ठिकाणी असलेले गुणदेखील आहेत. हे जग म्हणजे पंचमहाभूतांचा मेळ, संगम. पृथ्वीच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच गुण असतात. पृथ्वीत शब्दगुण आहे. भूगर्भात हालचाल होताना तिचा शब्द ऐकता येतो. तिला स्पर्श करता येतो, ती डोळ्यांना दिसते, तिच्यात रसगुण आहे. सार्‍या कडू-गोड वनस्पती तिच्यातून उगवतात आणि पहिला पाऊस पडताच मातीचा गंध दरवळतो. म्हणजे तिच्यात गंधगुण आहे. याप्रकारे पृथ्वीच्या ठायी पंचगुण आहेत. यापुढील भूतांत एकेक गुण कमी होत जातो. आप म्हणजे जल. जलात शब्द-स्पर्श-रूप-रस हे चार गुण आहेत. तेजात शब्द-स्पर्श-रूप हे तीन गुण आहेत. वायूत शब्द-स्पर्श हे दोन गुण तर आकाशात फक्त शब्द हा एकच गुण आहे. अशाप्रकारे पंचमहाभूते सगुण आहेत. परंतु आकाशापेक्षाही व्यापक असलेल्या परब्रह्मात मात्र एकही गुण नाही. तो निर्गुण आहे. याचा अर्थ हे पाचभौतिक विश्‍व सगुण आहे तर त्यापलीकडे असलेला परमात्मा निर्गुण आहे.

हे अर्थ समजून घेतले की मग पुढचे सारे सोपे होते. विश्‍व सगुण आहे आणि परमात्मा निर्गुण आहे. परंतु सोन्याचेच अलंकार होतात त्याप्रमाणे किंवा सागरावर लाट उसळली तरी ती सागरच असते त्याप्रमाणे विश्‍व हे परब्रह्माचे रूप आहे. सगुण-निर्गुण हा मुळातला भेद नाही. ते तर पाहण्यातले अंतर आहे. परमात्म्याकडे आपण जग म्हणून पाहतो तेव्हा तो जगद्रूपात दिसतो आणि परब्रह्म म्हणून पाहतो तेव्हा अंतर्बाह्य तोच व्यापून राहतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपांत गोविंद, एकच परतत्त्व व्यापून राहिलेले आहे.

हा गोविंद अनुमानाने जाणता येत नाही. अनुमान हे एक ‘प्रमाण’ आहे. ‘प्रमाण’ म्हणजे ज्ञानाचे साधन. प्रत्यक्षप्रमाण, अनुमानप्रमाण आणि शब्दप्रमाण अशी तीन मुख्य ‘प्रमाणे’ आहेत. डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणे हे ‘प्रत्यक्षप्रमाण’ होय. प्रत्यक्ष दिसणार्‍या वस्तूवरून दुसरी वस्तू जाणणे हे ‘अनुमानप्रमाण’ होय. धूर पाहून तेथे अग्नी असला पाहिजे, हे अनुमान आहे. एखाद्या व्यक्तीने काही पाहून, जाणून शब्दांत सांगितले तर त्याचे शब्द हे शब्दप्रमाण ठरते. वेदांचे शब्द आणि संतांचे अनुभवजन्य बोल म्हणजे शब्दप्रमाण. ज्ञानदृष्टी लाभली तर गोविंद प्रत्यक्ष दिसतो. तो अनुमानाचा विषय नाही, तर्काचा विषय नाही. अनुमान न पाहिलेल्या वस्तूबद्दल केले जाते. येथे तर सगुणरूपाने तो डोळ्यांपुढे साक्षात् उभा आहे. त्याच्याबद्दल अनुमान कशाला करायचे? एका आधुनिक कवीने म्हटले आहे, तू नाहीस तर वसंतातून कोण फुलतो? दवबिंदूंतून कोण झगमगतो? अवतीभोवती हेलावणार्‍या जनसागरातली असंख्य रूपे तुझी नाहीत तर कोणाची? ज्ञानदेव हेच सांगत आहेत. तो अनुमानाचा विषय नाही आणि त्याच्याबद्दल अनुमान करण्याची आवश्यकता नाही. वेदांनी देखील त्याच्या रूपाचा शोध घेताना ‘न इति न इति’- अजून संपले नाही- असे म्हणून त्याच्या समग्र, विराट रूपाकडे बोट दाखवले आहे.

त्याला स्थूल म्हणावे की सूक्ष्म? स्थूल सूक्ष्मावर उभे असते. इमारत दिसते, पण ती न दिसणार्‍या पायावर उभी असते. तसे हे स्थूल विश्‍व सूक्ष्म रूपावर उभे आहे. आकारामागे निराकार आहे, दृश्यामागे अदृश्य आहे, व्यक्तामागे अव्यक्त आहे आणि स्थूल-सूक्ष्म, आकार-निराकार, दृश्य-अदृश्य, व्यक्त-अव्यक्त हे सर्व मिळून एक तूच गोविंद विद्यमान आहेस. तुझ्यावाचून काहीही अस्तित्वात नाही. श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने ज्ञानदेवांना विश्‍वव्यापक गोविंद म्हणजेच श्रीविठ्ठल होय, अशी अनुभूती आली आहे. या अभंगात ज्ञानदेवांनी आपल्या समोर दोन रूपे उभी केली आहेत. सगुण-स्थूल-साकार-दृश्य-व्यक्त असे विश्‍व आणि निर्गुण-सूक्ष्म-निराकार-अदृश्य-अव्यक्त असा परमात्मा. विश्‍व आणि परमात्मा यांचे एकरूपत्व त्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे स्पष्ट केले आहे. परमेश्‍वरावर प्रेम करणे म्हणजे विश्‍वाचा तिरस्कार करणे नव्हे. हे जग असत्य, अशिव, असुंदर नव्हे. तर ते परमात्म्याप्रमाणेच सत्य, शिव, सुंदर आहे. कारण जग म्हणजे दृश्य परब्रह्मच आहे असा ज्ञानदेवांना साक्षात्कार झालेला आहे. जग तिरस्करणीय नसून प्रेमास्पद आहे, असे प्रतिपादन करणारे ज्ञानदेव हे महाराष्ट्रातील पहिले संत आहेत.
@ शे. दे. पसारकर
1997

No comments:

Post a Comment